वैनगंगेचे नदीपात्र आटले,तुमसरात पाणीटंचाई

0
11

तुमसर,दि.14 : कमी पडलेल्या पावसामुळे व उन्हाची दाहकता वाढल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण अधिकच वाढले आहे. परिणामी मार्च अखेर मध्ये जीवनदायनी वैनगंगेचे पात्र तर आटले आहे. त्याचबरोबर इटकवेल सभोवतालचे पाणी आटल्याने तुमसरकरांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. भविष्यात ही समस्या उग्ररुप धारण करेल. त्याकरिता तुमसरकरांनी पाण्याचा वापर जरा जपूनच करा, असे आवाहन नगराध्यक्ष प्रदिप पडोळे यांनी केले आहे.
तुमसर शहराला जीवनदायीनी वैनगंगा नदी पात्रातील माडगी पंप हाऊस येथून पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु नदीपात्रच आटल्याने पात्रातील इंटकवेल मध्ये पाणीच पोहचु शकत नसल्याने पाणी पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी वेळीच दखल घेतली व पाणीपुरवठा सभापती पंकज बालपांडे व अभियंता सचिन कांबळे यांना सोबत घेवुन माडगी पंप हाऊसला भेट दिली. पाहणी अंती नदीपात्रात मजुराच्या साहाय्याने इंटकवेल पर्यंत पाणी वळते करुन तुर्तास तुमसर वासीयांची गरज भागविली. नदीमध्ये जोपर्यंत पाणी आहे. तोपर्यंत पाणी इंटकवेल मध्ये आणण्याची सोय न.प. द्वारे केल्या जाणार आहे. त्याकरिता आता पासूनच नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून जपून वापर केल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या पाण्याच्या समस्येवर मात करता येईल, त्याकरिता नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे.