मुख्य बातम्या:

भामरागडच्या विद्यार्थिनी भारतीय कबड्डी संघात

गडचिरोली,दि.14 : नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणा-या भामरागडच्या दोन आदिवासी विद्यार्थिनींनी आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवत  थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. महाराष्ट्र संघात यशस्वी खेळ दाखविल्यानंतर त्यांची निवड भारतीय संघात झाली आहे. सिंधू देवू कुरसामी व जयश्री दौलत वड्डे अशी या दोघींची नावे आहेत.भामरागडच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात त्या यावर्षी दहावीला शिकत होत्या. पंजाबमधील मुनक येथे १९ ते २२ जानेवारीदरम्यान झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्र संघातर्फे खेळून आपले कौशल्य दाखविले. यावरून त्यांची निवड भारतीय संघात करण्यात आली. १७ वर्षे वयोगटातील भारतीय महिला कबड्डी संघात निवड होणा-या महाराष्ट्रातील केवळ त्या दोघीच आहेत. कॅनडा येथे ७ ते २० जूनदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत त्या दोघी आपले कौशल्य दाखवून भारतीय संघाचे नाव उज्वल करतील, असा विश्वास मुख्याध्यापिका मनिषा मुडपल्लीवार यांनी व्यक्त केला.

Share