वेगळ्या विदर्भाशिवाय आत्महत्या थांबणार नाही

0
11

नागपूर दि.१६:: शेतकरी ज्या हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे, ते जगासमोर आणण्यासाठी साहेबराव पाटील यांनी १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली होती. तेव्हापासूनचे सरकारचे धोरण अजूनही बदललेले नाही. आत्महत्या वाढतच आहेत. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार नाही, असे मत आत्महत्या केलेले शेतकरी साहेबराव पाटील यांचे बंधू प्रकाश पाटील यांच्या पत्नी छाया पाटील यांनी व्यक्त केले.
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवसीय संमेलनाचे सोमवारी प्रकाश पाटील व छाया पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप होते तर व्यासपीठावर मुख्य संयोजक राम नेवले, आर. एस. रुईकर, संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास खांदेवाले, धनंजय धार्मिक, प्रबीर चक्रवर्ती, डॉ. जी. एस. ख्वाजा, अ‍ॅड. नंदा पराते, विजया धोटे, राजकुमार तिरपुडे, अरुण केदार, ओंकार बुलबले, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, स्वतंत्र कोकण आंदोलनाचे अभ्यासक, प्रतिनिधी भाऊ पानसरे, आत्महत्यग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य प्रकाश राठोड, गोपाल दाभाडकर, दत्ता राठोड, सुमन सरोदे, त्रिवेणाबाई गुल्हाने, विठ्ठल राठोड, पारोमिता गोस्वामी, इंद्रजित आमगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विदर्भ राज्यात विकासच विकास, आनंदच आनंद या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
साहेबराव पाटील यांनी कशा परिस्थितीमध्ये आत्महत्या केली हे सांगताना छाया पाटील भावुक झाल्या होत्या. साहेबरावांनी कुटुंबासह आत्मबलिदान केले आहे. भारत कृषिप्रधान देश असून बहुतेक कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत. अवाढव्य लोकसंख्या असलेल्या या देशात स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही हजारो गावांमध्ये ज्ञानगंगा, विकासाची गंगा पोहोचली नाही. कष्टकरी, मजूर, कारागिरांची अवस्था उसाच्या चिपाडापेक्षाही दयनीय झाली आहे. सावकारी पाश, महागाईमुळे गरिबी पाचवीलाच पुजली आहे. साहेबराव उच्च शिक्षित होते, तरी त्यांनी कुटुंबासह आत्महत्या केली. शेतकºयांचे प्रश्न शासन दरबारी पोहोचावेत म्हणून त्यांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले.अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. वामनराव चटप म्हणाले, काहीही झाले तरी आता आम्ही सहन करणार नाही. विदर्भाचे आंदोलन हे स्वातंत्र्याची ज्योत आहे. ही ज्योत पुढे न्या. काही झाले तरी एकदा स्वतंंत्र विदर्भ राज्य हे माझे स्वप्न आहे, हे माझे स्वातंत्र्य आहे, असा संदेश येथून घेऊन जा, असे आवाहन केले.
प्रास्ताविक राम नेवले यांनी केले. संचालन डॉ. मंजूषा ठाकरे यांनी तर आभार कैलाश फाटे यांनी मानले.