मुख्य बातम्या:

बिरसा मुंडा यांच्या वंशजांचा दिल्लीत सत्कार

चंद्रपूर,दि.17 : इंग्रज सत्तेच्या शोषण व अत्याचारापासून देशाला स्वतंत्र करण्यास अनेक भारतीय सुपुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. प्रत्येक राष्ट्रीय सण, उत्सवप्रसंगी हा त्याग सर्वांना राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देत आहे. परंतु, या महान सुपूत्रांचे वंशज आज कोणत्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत, याचे स्मरण मात्र कुणी करत नाही. महान योद्धा, पराक्रमी महापुरूष भगवान बिरसा मुंडा यांचे कुटुंबीय आज अशाच दयनीय अवस्थेला तोंड देत आहेत. ही बाब माहित होताच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या कुटुंबीयास दिल्लीमध्ये आमंत्रित केले व त्यांचा सत्कार केला.
पुणे स्थित आदर्श मित्र मंडळ व श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था बल्लारपूरद्वारा गडचिरोली येथे आयोजित कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या वंशजांना आमंत्रित केले होते. यावेळी बिरसा मुंडा यांचे नातू सुखराम मुंडा व त्यांच्या मुलींची या कार्यक्रमास उपस्थिती होती. या कार्यक्रमास केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सुखराम व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सत्कार केला होता. भगवान बिरसा मुंडा यांच्या महान कार्याचे स्मरण करीत ना. अहीर यांनी लोकसभेत त्यांची प्रतिमा स्थापित करण्यात आल्याचे यावेळी सांगितले होते.
त्यामुळे सुखराम यांनी ना. अहीर यांना विनंती करून संसदेतील ती प्रतिमा बघण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे ना. अहीर यांनी त्यांना दिल्लीत बोलावून भगवान बिरसा मुंडांच्या प्रतिमेचे दर्शन घडवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या वंशजांना दिल्लीतील आपल्या शासकीय निवासस्थानी आमंत्रित करून त्यांचा सन्मान केला. त्यानंतर कुटुंबीयांना संसदेतील बिरसा मुंडांच्या प्रतिमेचे दर्शन घडवून देत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट करून दिली.
यावेळी सुखराम यांनी आपली दयनीय परिस्थिती ना. राजनाथ सिंग यांच्यापुढे कथन केली. यावेळी ना. राजनाथ सिंह यांनी सरकार आपल्या समस्यांकडे लक्ष देईल, असे आश्वासन दिले.

Share