ओप्पो एफ 7 ची डायमंड ब्लॅक एडिशन

0
14

अलीकडेच बाजारपेठेत उतारण्यात आलेल्या ओप्पो एफ७ या स्मार्टफोनची डायमंड ब्लॅक एडिशन या नावाने नवीन आवृत्ती आता ग्राहकांना सादर करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ओप्पो एफ७ या स्मार्टफोनला भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे उतारण्यात आले होते. हे मॉडेल दोन व्हेरियंटमध्ये मिळणार असल्याचे कंपनीने सूचीत केले होते. यातील ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज असणारे मॉडेल आधी उपलब्ध करण्यात आले होते. तर आता ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेज असणारे मॉडेल डायमंड ब्लॅक एडिशनच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहे. नावातच नमूद असल्यानुसार याचा रंगा काळा असून याला मेटलचे कव्हर प्रदान करण्यात आले आहे. २१ एप्रिलपासून हा स्मार्टफोन ओप्पो शॉपीजसह अमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएमसारख्या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येईल. यातील अन्य फिचर्स हे मूळ मॉडेलनुसारच असतील.

ओप्पो एफ ७ हा स्मार्टफोन आयफोन एक्स या मॉडेलप्रमाणेच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले १९:९ गुणोत्तर असणारा, फुल स्क्रीन २.० या प्रकारातील तसेच ६.२३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस ( २२८० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा असेल. यात ऑक्टा-कोअर मीडियाटेक हेलिओ पी६० हा प्रोसेसर देण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये २५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात एआय ब्युटी टेक्नॉलॉजी, रिअल टाईम प्रिव्ह्यू, एआर स्टीकर्स, बोके इफेक्ट आदी फिचर्स देण्यात आले आहेत. तर यातील मुख्य कॅमेरा १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. यात एलईडी फ्लॅश असेल. याच्या जोडीला एआय अल्बम हे फिचर देण्यात आले आहे. याच्या अंतर्गत आर्टीफिशियल इंटिलेजीयन्सच्या मदतीने विविध वर्गीकरणाने युक्त असणारी फोटो लायब्ररी तयार करण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ३४०० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीने सज्ज आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा कलरओएस ५.० हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे.

English summary: 
Oppo has launch Diamond Black Edition of Oppo F7