‘कायाकल्प’ राष्ट्रीय पुरस्कार : गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम

0
6

बारामती व श्रीरामपूरचाही सन्मान

नवी दिल्ली : स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणारे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम ठरले आहे. आज केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते या रूग्णालयाला ‘कायाकल्प राष्ट्रीय’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. बारामती येथील महिला रुग्णालय व अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालयाचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
रूग्णालय व रूग्णालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यात केंद्र शासनाच्या मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्‍या देशातील रुग्णालयांना यावेळी ‘कायाकल्प राष्ट्रीय पुरस्काराने’ गौरविण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत देशभरातील रूग्णालये, संस्था आणि विविध राज्यातील रूग्णालये अशा दोन श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने येथील डॉ.राममनोहर लोहिया रूग्णालयाच्या पीजीआयएमईआर सभागृहात आज ‘कायाकल्प राष्ट्रीय पुरस्कार २०१७-१८’ चे वितरण करण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, विभागाच्या सचिव प्रीती सुदान, केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाचे सचिव परमेश्वरम अय्यर यावेळी मंचावर उपस्थित होते.
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय प्रथम
‘राज्यांच्या श्रेणी’ मध्ये महाराष्ट्रातून तीन रुग्णालयांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. केंद्र शासनाच्या स्वच्छता मानकांची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी करणारे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यातून प्रथम ठरले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल रोडे यांनी या कार्यक्रमात हा पुरस्कार स्वीकारला. ५० लाख रूपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
बारामती व श्रीरामपूरचाही सन्मान
पुणे जिल्ह्यातील बारामती येथील महिला रुग्णालय ‘कायाकल्प पुरस्कार स्पर्धेत’ राज्यात उपविजेते ठरले. वैद्यकीय अधीक्षक डॉ.सदानंद काळे व उपवैद्यकीय अधीक्षक बापू भोई यांनी हा पुरस्कार स्वीकारला. २० लाख रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालय हे ग्रामीण रूग्णालयांमधून राज्यात प्रथम ठरले. या रूग्णालयाचाही कायाकल्प पुरस्काराने सन्मान करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्हि.के.जमधाडे व जिल्हा गुणवत्ता आश्वासक समन्वयक डॉ.राहुल शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. १५ लाख रूपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
वर्धा येथील महात्मा गांधी वैद्यकीय संस्थेचाही सन्मान
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत देशातील रूग्णालयांच्या श्रेणीत राज्यातील वर्धा येथील महात्मा गांधी वैद्यकशास्त्र संस्थेचा सन्मान करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस.पी. कलंत्री आणि डॉ. बी.एस. गर्ग यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार स्वरूपात मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा, राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, विभागाच्या सचिव प्रिती सुदान, केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाचे सचिव परमेश्वरम अय्यर यांनी उपस्थितांना संबोधित केले.