विजेच्या धक्क्याने चार रानगव्यांचा मृत्यू

0
40

साकोली,दि.22 : सध्या उन्हाचा तडाखा माणसासह जनावरांनाही सोसणे कठीण झाले आहे. यातच जंगलात पाण्याची अपुरी व्यवस्था व आटलेले तलाव यामुळे वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहे. पाण्याच्या शोधात चार रानगवे शेताकडे गेली व तिथेच त्यांना आपला प्राण गमवावा लागला. ही घटना बांपेवाडा शेतशिवारात तीन दिवसांपूर्वी घडली. चार रानगव्यांचा विद्युत प्रवाहाच्या धक्याने मृत्यू झाला.बांपेवाडा शिवारालगत नागझिरा अभयारण्य लागून आहे. या जंगल परिसरात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र यावर्षी पावसाळ्यात पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे जंगलातील तलाव कोरडेच राहिले.
परिणामी पाण्याची भीषण समस्या जंगलातही जाणवत आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधासाठी वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहेत. पांडुरंग चांदेवार रा.बांपेवाडा यांच्या शेतात उन्हाळी धान पिक आहे. मात्र सदर शेतशिवाराला लागूनच जंगलाचा परिसर आहे. त्यामुळे जंगली जानवर शेतात येऊन धानाची नासधूस करतात. म्हणून चांदेवार यांनी शेतात विद्युत करंट लावून ठेवले होते. मात्र रात्री अंधारात पाण्याच्या शोधात आलेल्या चार रानगव्यांना शेतातच विद्युत प्रवाहाचा झटका लागला. त्यामुळे घटनास्थळीच चारही रानगव्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्राधिकारी कोळी, सहाय्यक वनक्षेत्राधिकारी खोटेले, वनरक्षक गिºहेपुंजे ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले.त्यांनी चारही रानगव्यांचा पंचनामा करून यात दोन मादी रानगव्यांचा समावेश असून त्यांचे वय अंदाजे साडेतीन ते चार वर्षे आहे. तर दोन रानगव्यांची पिल्ले आहेत. त्यांचे वय अंदाजे ६ महिने ते १ वर्षे असे आहे.