कंत्राटी आरोग्य कर्मचारी संघटनेचे आंदोलन मागे,कर्मचाऱ्यांत असंतोष

0
18

नागपूर विभागीय आरोग्य कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षाने दिला राजीनामा

गोंदिया,दि.22ः- राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत अधिकारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समायोजित करून घ्यावे, तसेच समान काम, समान वेतन द्यावे या प्रमुख मागणीसाठी राज्यभर गेल्या 11 दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनामुळे आरोग्य सेवा कोलमडली होती.प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला होता.त्यातच शनिवार 21 एप्रिलला आरोग्यमंत्री डाॅ.दिपक सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत येत्या सरळसेवा भरतीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त जागेवर समायोजन करण्यासाठी ग्रामविकास मंत्र्यासोबत चर्चा करुन तसा आदेश काढण्याचे आश्वासन देत 10 दिवसात मागण्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन संघटनेचे राज्य अध्यक्ष,सचिव व उपाध्यक्षांना देण्यात आले.मात्र चर्चैच्या इतिवृत्तात सरळ सरळ समानवेतन समान काम यावर स्पष्ट नकार देण्यात आले आहे.त्यातच रिक्त असलेल्या पदावर जी पदे मंजुर असतील त्या पदावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाच सामावून घेण्याचे म्हटले आहे. या चर्चेनुसार संघटनेच्या अध्यक्ष व सचिवांनी हे आंदोलन मागे घेण्यात येत असून 10 दिवसानंतर योग्य न्याय न मिळाल्यास अजून तीव्र आंदोलन करु असे म्हणत राज्यव्यापी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.राज्य अध्यक्ष व सचिवाने केलेल्या या घोषणेंचा राज्यात सर्वत्र विरोध होत असून राज्यपदाधिकारी हे सरकारसमोर झुकले आणि आमचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे.विशेष म्हणजे या निर्णयाच्या विरोधात नागपूर विभागीय अध्यक्ष आशिष खांडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुध्दा दिला आहे.तर भंडारा येथील संघटनेने आपला आंदोलन सुरुच राहील अशा पवित्रा घेतला आहे.आरोग्य कंत्राटी कर्मचारी अधिकारी संघटनेत चर्चेच्या माध्यमातून सरकारने फुट पाडण्याचा डाव यशस्वी केल्याची चर्चा आहे.