सावली नजीक एसटीबसला अपघात

0
19
देवरी,दि.24- गोंदियावरून प्रवासी घेऊन देवरीकडे निघालेल्या एसटी बसला सावली-डोंगरगाव नजीक अपघात आज सकाळी साडेआठच्या सुमारास झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात 4-5 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, कासवगतीने या मार्गाचे बांधकाम सुरू असून संकेत दर्शक फलकाअभावी होणाऱ्या अपघातांच्या संख्येत भर पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सविस्तर असे की, गोंदिया येथून सुमारे 40 प्रवासी घेऊन देवरीकडे निघालेल्या गोंदिया आगाराच्या बसला (क्र. एमएच 06 एस 8852 सावली डोंगरगाव दरम्यान असलेल्या वळणावर आज सकाळी साडेआठच्या सुमारास अपघात झाला. बसचालकाने रस्ता बांधकाम सुरू असताना आणि समोर वळण असताना आपल्या वाहनाचा वेग कमी केला नसल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. बस वळणावर अनियंत्रित झाल्याने बस नवनिर्मीत रस्त्याच्या कडेला शेतात घुसली. यामुळे या बसमधील 4 ते 5 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येते.
उल्लेखनीय म्हणजे आमगाव-देवरी या महामार्गावरील हरदोली ते देवरी दरम्यान नवीन रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी वेळेवर सांकेतांक दर्शक फलक सुद्धा कंत्राटदार कंपनी लावत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. दरम्यान, सदर रस्त्याचे बांधकाम अत्यंत कासवगतीने सुरू असून देवरी हरदोली दरम्यान संपूर्ण रस्ता खोदल्याने पावसाळ्यापूर्वी तो तयार झाला नाही तर अनेक संकटांना नागरिक आणि वाहनचालकांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.