एप्रिल महिन्याच्या शेवटचे तीन दिवस बँका राहणार बंद

0
11

मुंबई,दि.24- एप्रिल महिन्याच्या शेवटच्या तारखेला तुम्हाला पैशाची चणचण भासू शकते. कारण महिन्याच्या शेवटच्या तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. याचा सरळ सरळ एटीएमच्या सेवेवर परिणाम होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरातल्या अनेक भागात एटीएममध्ये पैशांचा खडखडाट असल्याने लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. सरकारने ही समस्या सोडवण्यासाठी अनेक उपायही योजले होते. परंतु अडचणी अद्यापही कायम आहेत.
तीन दिवस बँका बंद असल्यानं पैशांचा तुटवडा होऊ शकतो. खरं तर लांब सुट्ट्या आल्यानंतर अतिरिक्त रकमेची व्यवस्था केली जाते. परंतु यावेळी परिस्थिती काहीशी वेगळी आहे. 28 एप्रिलला महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. तर 29 एप्रिलला आठवड्याची सुट्टी म्हणजेच रविवार असल्यानं बँका बंद राहणार आहेत. तसेच सरकारने 30 एप्रिल रोजी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे शुक्रवार 27 एप्रिलला एटीएममध्ये रोकड टाकण्यात येईल. तसेच सद्यस्थितीत एटीएममध्ये पुरवठ्यापेक्षा कमी रक्कम आहे. सलगच्या सार्वजनिक सुट्ट्यांमुळे बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे एटीएमवर ग्राहकांची मोठी गर्दी होणार आहे. मात्र, ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एटीएममध्ये पैशांचा जास्तीचा भरणा करण्यात आल्याचे बँकाकडून सांगण्यात आले. मात्र, एटीएम कार्डची मर्यादा आणि बँकेने लावून दिलेला सेवाकर लक्षात ठेवून एटीएम कार्डचा वापर करावा. एटीएम कार्डची पैसे काढण्याची मर्यादा जेवढी असेल तेवढेच पैसे काढता येणार आहेत, अशी माहिती बँक तज्ज्ञांनी दिली आहे.

‘ऑनलाइन-नेट बँकिंग’चा होणार फायदा
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग या सेवांचा फायदा या सलग सुट्ट्यांच्या दिवशी नागरिकांना होणार आहे. मॉल, दुकाने, हॉटेलमध्ये ऑनलाइन व्यवहारांमुळे नागरिकांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत.