स्विफ्टची झाडाला धडक; एक ठार, दोन जखमी

0
11

कुरखेडा,दि.25 – चारचाकीची झाडाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात चार वर्षीय चिमुकला जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना आज २५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील पुराडा – मालेवाडा मार्गावरील रामगड गावानजिक असलेल्या तलावाच्या वळणावर घडली.नक्ष जितेंद्र भरणे (४) असे ठार झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर विद्या भरणे व जितेंद्र भरणे असे जखमी पतीपत्नीचे नाव आहे. मात्र त्यांच्यासोबत असलेल्या दीड वर्षीय चिमुकल्याला काहीच झालेले नाही.
प्राप्त माहितीनुसाार मालेवाडा येथील जितेंद्र भरणे आपल्या कुटुंबासह गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे आज नातेवाईकांकडे असलेल्या लग्न समारंभासाठी स्वत:च्या स्विफ्ट कारने जात होते. दरम्यान रामगड गावशेजारी असलेल्या तलावाच्या वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकीने रस्त्यालगतच्या झाडाला धडक दिली. या अपघातात जितेंद्र भरणे यांचा चार वर्षीय मुलगा नक्ष जितेंद्र भरणे जागीच ठार झाला. तर जितेंद्र भरणे व त्यांची पत्नी विद्या भरणे जखमी झाले. सुदैवाने यामध्ये त्यांच्या दीडवर्षीय चिमुकल्याला काहीच झाले नाही.जखमींना पुराडा येथील प्राथमिक आरोग्य पथकात प्राथमिक उपचारानंतर कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.