१ मे पासून आॅनलाइन साताबारा : चंद्रकांत पाटील

0
15

पुणे(विशेष प्रतिनिधी)दि.25 : राज्यातील ४३ हजार ९४८ महसूली गावांपैकी ४० हजार ७७८ गावांमध्ये ७/१२ आॅनलाइन मिळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अद्याप ३००० गावातील संगणकीकरणाचे काम बाकी असून एप्रिल अखेर काम पूर्ण होवून १ मे पासून राज्यात संगणकीकृत सातबारा मिळणार असल्याचे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
पुणे जिल्हा परिषदेत मुद्रांक विभागाने २६ हजार ५00 कोटींचा महसूल वसूल केल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नोंदणी मुद्रांक आयुक्त अनिल कवडे, जमाबंदी आयुक्त एस़ चोक्कलिंगम, सांगलीचे मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद कराड आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, आतापर्यंत अनेकवेळा संपूर्ण राज्यात सातबारा आॅनलाईन मिळेल, अशी घोषणा केली होती. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे ही प्रक्रिया खोळंबत राहिली. आता १ मे पासून आॅनलाईन साताबारा मिळणार असून  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ, जालना, उस्मानाबाद, गोंदिया, नागपूर, आणि भंडारा जिल्ह्यात १०० टक्के काम झाले आहे. तर १९ जिल्ह्यामध्ये ९० टक्केपेक्षा अधिक काम झाले आहे. पुणे विभागातील पुणे जिल्हा ५५ टक्के , सातारा ५०.२६ टक्के आणि कोल्हापूर जिल्ह्यातील १९.९७ टक्के सातबारा आॅनलाइन झाले आहेत. सर्वांत कमी कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा १७.९७ आणि रत्नागिरीमध्ये केवळ ११.७६ टक्के काम पूर्ण झाल्याचेही पाटील यांनी सांगितले.