राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुनिल तटकरे

0
12

मुंबई,दु.26: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्ष शरद पवार यांनी तटकरे यांची निवड केली असून तसं पत्र पक्षाचे जनरल सेक्रेटरी तारीक अन्वर यांनी सुनिल तटकरे आणि प्रदेश कार्यालयात पाठवले आहे.गेली 4 वर्षे सुनिल तटकरे यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. तटकरे यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली जात असल्याचे राष्ट्रवादीनं प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तटकरेंची राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याने प्रदेशाध्यक्षपद रिक्त झाले. त्यामुळे या पदावर कोणाची निवड होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीचा राज्यातील नेतृत्त्व बदल होणे निश्चित झाले आहे. नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेतील गटनेते जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील आणि शशिकांत शिंदे यांची नावे चर्चेत असून येत्या 29 एप्रिलला पुण्यात होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा होणार आहे.खासदार सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील यांच्या नावाला अनुकूलता दर्शवल्याने जयंत पाटील यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आता आपण या पदावरून पायऊतार होऊ इच्छित असल्याची भावना पक्षनेतृत्वाला कळवल्याची माहिती खुद्द सुनील तटकरे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. सत्तेतून पायऊतार झाल्यानंतर विरोधी बाकांवर असताना नव्याने पक्ष बांधणीची संधी आपल्याला या निमित्ताने मिळाली. शिवाय या चार वर्षांच्या कार्यकाळात चार वेळा राज्याचा दौरा करता आला. तसेच आपल्या कार्यकाळात सरकारच्या विरोधातील हल्लाबोल यात्रेचे यशस्वी नियोजन केले. आता या पदावर नव्या नेतृत्वाला संधी देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. येत्या 29 एप्रिल रोजी पुण्यात पक्षाची विस्तारीत कार्यकारिणी निश्चित करण्यासाठी होणाऱ्या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाईल, असे ते म्हणाले.