महाराष्ट्र दिनीचा सिरोंचात तहसील कार्यालयासमोर विदर्भवादयानी दिले धरणे

0
8

गडचिरोली:दि.१: आज १ मे रोजी असलेल्या महाराष्ट्र दिनाचा निषेध करून सिरोंचावासीयांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.  यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.हे धरणे आंदोलन  सिरोंचा तालुक्यातील आरडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच रंगू बापू यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याची निर्मिती होवून ५८ वर्षे होत आहेत. या कालखंडात विदर्भाला नेहमी दुय्यम स्थान दिले आहे. यामुळे विदर्भ मागासलेला आहे. महाराष्ट्र  राज्यात राहूनही विदर्भाचा विकास होवू शकत नाही यामुळे नागपूर राजधानीसह वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करावी, सिरोंचा तालुक्यातील विविध समस्या सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली.
यासह सिरोंचा – असरअल्ली व सिरोंचा – अहेरी मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, सात दिवसात रस्त दुरूस्त न झाल्यास मेडीगट्टा प्रकल्पाकडे जाणार्या जड वाहनांना बंदी घालण्यात येईल, सिरोंचा तालुक्यातील प्रलंबित वनजमीन पट्टे त्वरीत देण्यात यावे, भारतीय स्टेट बॅंकेची शाखा सुरू करण्यात यावी, खासगी मोबाईल मनोऱ्यांना मंजूरी देण्यात यावी, बीएसएनएलची टाॅवर लाईन कालेश्वर, तेलंगणा सोबत जोडण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदन देताना आरडा ग्रा.पं. चे रंगु बापू यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.