राकाँकडून शिवणकर,कुकडे व फुंडे यांची दावेदारी

0
43

भंडारा,दि.03 :भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या येत्या 28 मे रोजी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगेसकडून माजी आमदार मधुकर कुकडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर तसेच जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष सुनिल फुंडे हे प्रबळ दावेदार समजले जात आहेत.त्यातच हा मतदारसंघ राष्ट्रवादीलाच असल्याने काँग्रेसला आघाडी धर्माचे पालन करावे लागणार आहे.राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल हे उमेदवाराच्या अंतिम निवडीसाठी गोंदियात दाखल झाले आहेत.ते सलग तीन दिवस गोंदिया -भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी भेट घेऊन चर्चा करणार आहेत.सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विजय शिवणकर किंवा मधुकर कुकडे यांच्यापैकी एका नावावर आज शिक्कामोर्तबत होण्याचे चिन्ह आहेत.

१५ वर्षे भाजपचे आमदार राहिलेले मधुकर कुकडे यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्यानंतर आता ते २८ मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून दावेदारी केली आहे. मधुकर कुकडे हे राष्ट्रवादीचे भंडारा जिल्हाध्यक्ष म्हणून चार वर्षांपासून कार्यरत आहेत. या चार वर्षांत त्यांनी राष्ट्रवादीचे पक्ष संघटन वाढविण्यासाठी गावागावात बुथ कमिटी स्थापन करण्यापासून कार्यकर्त्यांना एकत्रित आणण्याचे काम केले. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाविरूध्द आंदोलने, मोर्चे आणि निवेदन देण्यासाठी कार्यकर्त्यांना एकसंघ केले. आजही ते जिल्हा कार्यालयात बैठका घेऊन आणि जिथे गरज आहे तिथे स्वत: जावून जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी अग्रेसर राहतात.