बार मालकाचे अपहरण करून हत्येचा प्रयत्न

0
8

नागपूर,दि.7 : अट्टल गुन्हेगारांनी पाचपावलीतील बारमालक परमानंद तलरेजा यांचे अपहरण करून त्यांना तलवारीने मारून गंभीर जखमी केले. बेशुद्धावस्थेतील तलरेजा यांना मृत समजून आरोपींनी एका मैदानात फेकून दिले आणि पळून गेले. तक्रार मिळताच पोलिसांनी रात्रभर शोधाशोध करून तलरेजा यांना पहाटे गंभीर अवस्थेत ताब्यात घेतले. तत्पूर्वीच चार आरोपींना अटक केली. काही आरोपी फरार आहेत. खंडणी वसुलीसाठी आणि आपली दहशत निर्माण करण्यासाठी हे अपहरण आणि हत्याकांड घडल्याचे पोलीस सांगतात.
आकाश चिंचखेडे, मोनू समुद्रे, सौरभ तायवाडे आणि आकाश नागुलकर अशी या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
वैशालीनगरातील रहिवासी तलरेजा यांचा पाचपावलीत कमाल चौकाजवळ बियर बार आहे. रविवारी रात्री ११.४५ च्या सुमारास ते आपल्या बारसमोर बसून असताना उपरोक्त आरोपी तेथे आले. त्यांनी दारूच्या पैश्यावरून तलरेजा यांच्यासोबत वाद घातला. यानंतर त्यांना खंडणीची मागणी केली. त्यांनी नकार देताच घातक शस्त्राच्या धाकावर आरोपींनी तलरेजा यांना मारहाण करीत फरफटत नेले. काही अंतरावर असलेल्या कुख्यात अजय चिंचखेडेच्या घरी तलरेजा यांना आरोपी घेऊन गेले. तेथे त्यांच्यावर तलवारीचे घाव घातल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांचा मृत्यू झाला, असे समजून आरोपींनी बाळाभाऊ पेठेतील ग्राऊंडजवळ नेऊन तलरेजांना फेकून दिले.
दरम्यान, आरोपींनी परमानंद तलरेजा यांना शस्त्राच्या धाकावर पळवून नेल्याची माहिती बारमधील एकाने नियंत्रण कक्षात फोन करून कळविली. त्यानंतर पाचपावलीचा पोलीस ताफा बारमध्ये पोहचला. तेथून माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी तलरेजा तसेच आरोपींचा शोध घेणे सुरू केले. आजुबाजुच्या पोलीस ठाण्यातही बारमालकाचे कुख्यात गुंडांनी अपहरण केल्याची माहिती कळविण्यात आली. त्यामुळे गस्तीवरील पोलिसांना पहाटे तीन ते चारच्या सुमारास आरोपींना नंदनवनमध्ये पकडले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना तलरेजांबाबत विचारणा करण्यात आली. तलरेजांना बाळाभाऊ पेठेतील एका मैदानात मारून फेकल्याचे आरोपींनी सांगितले. पोलिसांनी लगेच आरोपींना घेऊन ते मैदान गाठले. तेथे रक्ताच्या थारोळ्यात तलरेजा पडून होते. ते जीवंत असल्याचे लक्षात आल्याने त्यांना लगेच एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.