पावसाळीपाठोपाठ हिवाळी अधिवेशनही नागपुरात?

0
21

नागपूर,दि. ८. – मुंबईतील आमदारांचे निवासस्थान ‘मनोरा’ पाडण्यात येणार असल्याने पावसाळी अधिवेशनाच्या पाठोपाठ हिवाळी अधिवेशनसुद्धा नागपूरमध्ये होण्याची शक्‍यता आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी भाजपला वैदर्भीयांना खूष करण्याची संधी मिळणार आहे. नागपुरात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी मंगळवारी (दि. ८) सायंकाळी पाच वाजता बैठक बोलविली आहे. यंदा पावसाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. ४ जुलैपासून अधिवेशन सुरू होणार असून, तशी घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. अधिवेशनासाठी हजारो अधिकारी व कर्मचारी नागपुरात दाखल होतील. हिवाळी अधिवेशन साधारणत: दोन आठवडेच चालत असे. पावसाळी अधिवेशन तीन ते चार आठवडे चालते. त्यादृष्टीने तयारी करावी लागणार आहे. यासाठी विधानभवन, रविभवन, नागभवन, आमदार निवास, हैदराबाद हाऊस सज्ज करावे लागणार असून, देखभाल दुरुस्ती करावी लागणार आहे.

ब्रिटिशकालीन मॅजेस्टिक इमारतही जुनी झाली आहे. हिवाळी अधिवेशन मुंबईत घेतल्यास आमदारांच्या राहण्याचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. अधिवेशन काळात सर्वांची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्याची तयारी सरकारने दर्शवली होती. त्याकरिता प्रत्येकी एक लाख रुपये खर्च दिला जाणार होता. मात्र कार्यकर्त्यांचा खर्च कोण करणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.त्यांचा खर्च करण्याची तयारी सरकारची नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशन नागपूरला हलविण्याचा विचार सरकारचा सुरू आहे. पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन नागपुरात घेऊन भाजप एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जाते.