आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा — अभिमन्यु काळे

0
15
????????????????????????????????????

 मतदान केंद्र निश्चित करा
 एसएसटी व व्हिडिओ पथक नेमा
 रोख व दारु वाहतुकीवर नियंत्रण ठेवा
भंडारा, दि.८ :- भंडारा-गोंदिया लोकसभा पोट निवडणूकीसाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत १० मे २०१८ असून उमेदवारी अर्ज दाखल झाल्या दिवसापासून उमेदवारांसाठी असलेल्या आदर्श आचार संहितेची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यु काळे यांनी दिले. भंडारा व गोंदिया जिल्हयात रोख वाहतुक व दारु वाहतुकीवर कडक निर्बंध घालण्याच्या सूचना पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूकीसंबंधी आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
भंडारा जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, गोंदिया जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भूजबळ, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे,उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसिलदार या बैठकीस उपस्थित होते.
दोन्ही जिल्हयात असलेल्या मतदान केंद्राचा आढावा घेवून केंद्र निश्चित करण्यात यावेत. यात संवेदनशिल, अतिसंवेदनशिल व व्हलरनेबल मतदान केंद्राची निश्चिती करण्यात यावी, अशा सूचना काळे यांनी दिल्या. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी स्ट्रांग रुम तयार करण्यात यावी. स्टॅटिक्स सर्व्हेलन्स टिम व व्हिडिओ पथक नेमन्यात यावे. निवडणूकीच्या निमित्ताने अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सभा होत असतात. ही बाब लक्षात घेता सभेसाठी लागणाऱ्या परवानग्यासाठी एक खिडकी योजना राबवावी. सभेच्या परवानगीची एक प्रत जिल्हा निवडणूक शाखेकडे पाठवावी.
सभेची परवानगी देतांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य हे धोरण राबवावे. अतिमहत्वांच्या व्यक्तींसाठी हेलीकॉपटरची परवानगी आवश्यक असल्यास त्या अनुषंगाने परवानगी दयावी, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे विनापरवानगी सभा व रॅली निघणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. निवडणूक प्रचारासाठी अनेक पक्ष पॉम्पलेट व हँडबील प्रकाशित करतात त्यावर मुद्रक प्रकाशकाचे नाव असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या तारखा निश्चित करुन तात्काळ प्रशिक्षण घ्यावे. यामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे प्रशिक्षण योग्य प्रकारे देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. निवडणूक निरिक्षक १० मे रोजी दाखल होणार असून काही मतदार केंद्रांना भेटी देणार आहेत. मतदान केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात. निरिक्षक या सुविधांची तपासणी करणार असून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
प्रत्येक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वाहतुक आराखडा तयार करावा, अशा सूचना काळे यांनी दिल्या. निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात यावी. आचार संहिता भंग झाल्यास तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा. आचार संहितेच्या गुन्हयासाठी पोलीस विभागाने स्वतंत्र नोंदवही ठेवावी, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने काम करण्यात यावे, असे ते म्हणाले. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे यांनी समाजिक न्याय भवन येथे भेट देवून मतमोजणीसाठीच्या जागेची पाहणी केली.