दोन सापळ्यात तीन लाचखोर जाळ्यात: पोलिस उपनिरीक्षक, ग्रामसेवकासह तिघांना अटक

0
14

गोंदिया,दि.१० : जिल्ह्यात लाचलुचपत विभागाने दोन ठिकाणी सापळा रचून ग्रामसेवक, पोलिस उपनिरीक्षक व एका खासगी इसमाला लाच घेताना रंगेहात अटक केली. ही कारवाई गोंदिया व भंडारा लाचलुचपत विभागाने केली आहे. सालेकसा तालुक्यातील नवाटोला येथील ग्रामसेवक विनोदकुमार शिवप्रसाद श्रीवास्तव याला काल (ता.९) ५ हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. तर आज (ता.१०) गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक किशोर यादवराव लिल्हारे व एक खासगी इसम शंकरराव आत्माराम भोवते या दोघांना २५ हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली.

सालेकसा  तालुक्यातील नवाटोला येथे तक्रारदाराने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांचा गोठा मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायत बिजेपार येथे नाव नोंदविले होते. जनावरांच्या गोठ्याचा प्रस्ताव पंचायत समितीला पाठविण्यासाठी आरोपी ग्रामसेवक विनोद श्रीवास्तव (४३) याने तक्रारदाराला ५ हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, लाच देऊन प्रस्ताव मंजूर करण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार नोंदविली. तक्रारीची पडताळणी करून ९ मे रोजी सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी विनोद श्रीवास्तव याने पंचासमक्ष ५ हजार रुपये स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई पोलिस उपायुक्त पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात, पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोलिस निरीक्षक दिलीप वाढनकर, दिवाकर भदाडे, रंजीत बिसेन, नितीन रहांगडाले, वंदना बिसेन, देवानंद मारबते आदींनी पार पाडली.

गोंदिया शहरातील ग्रामीण पोलिस ठाण्याअंतर्गत हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तीन आरोपींची नावे मागे घेण्यासाठी आरोपी पोलिस उपनिरीक्षक किशोर यादोराव लिल्हारे व खासगी इसम शंकरराव आत्माराम भोवते यांनी तक्रारदाराकडून ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे कबूल झाले. मात्र, तक्रारदाराला पैसे देऊन नावे मागे घेण्याची इच्छा नसल्याने याची तक्रार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केली. तक्रारीची पडताळणी करून आज (ता.१०) सापडा रचण्यात आला. यावेळी दोन्ही आरोपींनी पंचासमक्ष २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई पोलिस उपअधीक्षक दिनकर सावरकर, पोलिस निरीक्षक प्रतावराव भोसले, पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, पोना गौतम राऊत, सचिन हलमारे, अश्विनकुमार गोस्वामी, पराग राऊत, कोमल बनकर, शेखर देशकर, दिनेश धार्मिक यांनी केली. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.