मुख्य बातम्या:

पतीने केला पत्नीचा खून

आमगाव,दि.12 : पती-पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यावर काठीने जबर मारहाण करून तिचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि.११) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास आमगाव तालुक्यातील किंडगीपार येथे घडली. आमगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपी पतीला अटक केली आहे.
शंकर लक्ष्मण मुनेश्वर, रा. किंडगीपार असे आरोपी पतीचे नाव आहे. डिलेश्वरी मुनेश्वर असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार शंकर हा पत्नी व दोन मुलांसह किंडगीपार येथे राहत होता. शंकर हा मोटार मॅकेनिकचे काम करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होता. पत्नी डिलेश्वरी मुनेश्वर हिच्यासोबत त्याचा नेहमी वाद होत होता. यामुळे शंकर त्रस्त असल्याचे बोलल्या जाते. शुक्रवारी (दि.११) रात्री ७.३० वाजता पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. या दरम्यान शंकरने स्वयंपाक घरातील चुलीमधील काठी उचलून डिलेश्वरीच्या डोक्यावर जबर मारहाण केली.
यात तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादी मेघनाथ दयाराम मेंढे (६१) रा. किंडगीपार यांनी आमगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
तक्रारीवरुन आमगाव पोलिसांनी भादंवि ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद करुन आरोपी पती शंकर मुनेश्वरला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहे.

Share