मुख्य बातम्या:

गरजेनुसार शिक्षण ही काळाची गरज – कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

नांदेड,दि.15ः-पारंपारिक शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण ही गरज होती. पण आज गरजेनुसार शिक्षण ही काळाची गरज आहे, असे मत आज मंगळवार दि.१५ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पंचवार्षिक बृहत आराखड्याच्या सहविचार सभेत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर मांडले. यावेळी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे आणि कुलसचिव डॉ. रमजान मुलानी यांची उपस्थिती होती.

पुढे ते म्हणाले, शिक्षण पद्धतीमध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये बद्दल करतांना केवळ स्थानिक पातळीचा विचार न करता आंतरराष्ट्रीय पातळीचा विचार करावा. शेती विषयक भरपूर संशोधनाची आवश्यकता आहे. नवनवीन शेतीचे तंत्रज्ञान अवगत करून त्यामध्ये नाविन्यपूर्ण बद्दल करणे आवश्यक आहे. भविष्यातील बदलांचा वेध घेत आज घडीला आपल्या मानसिकतेमध्ये बद्दल करावेत व तसेच पारंपारिक शिक्षणासोबत कौशल्य आधारित शिक्षण देण्याची गरज आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी तथा शिक्षण तज्ज्ञांनी बृहत आराखड्याबाबत अनेक अभ्यासक्रम, अभ्यासक्रमातील त्रुतीची दुरुस्ती, अनुदान उभारणी योजना, भरती प्रक्रिया, वसतिगृह, शेती विषयक व्यवसाय, महिलांशी संबंधीत शैक्षणिक सुधारणा, रात्रीचे महाविद्यालये, वैद्यकीय सेवेशी निगडीत तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम, शेली पालन, सिल्क आदीं विषयक अभ्यासक्रम, लेखन, संभाषण आणि मुद्रण कौशल्य, मुद्रित शोधन, पालीभाषा विषयक, अशिक्षित पोलीस पाटील, सरपंच इत्यादींसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम, शिल्पकला, चित्रकला या विषयी कौशल्य आधारित अभ्यासक्रम, हर्बल मेडिसिन, कॉटन इंडस्ट्रीज, समाजाभिमुख संशोधन इत्यादी अनेक विषयावर आपले मत मांडले आणि सूचना केल्या.अधिसभा सभागृहामध्ये पार पडलेल्या या सहविचार सभेचे प्रास्ताविक करतांना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी सहविचार सभेचा नेमका उद्देश उपस्थितांसमोर मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम. के. पाटील यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. रमजान मुलानी यांनी मानले.या सहविचार सभेस विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक, संस्थाचालक,शिक्षणतज्ञ, विधीज्ञ, माध्यम प्रतिनिधी, विद्यार्थी, पालक आदीं व्यक्तीनी मोठ्यासंख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.एस.के.जी. कृष्णमाचार्युलू, उपकुलसचिव विठ्ठल चालीकवार, अधीक्षक रवि मोहरीर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील रावळे, उद्धव हंबर्डे, सिमरनकौर खालसा, पल्लवी कुरुडे यांनी परिश्रम घेतले.

Share