रोहयो अतिरिक्त सचिव सारंगीने साधला रोहयो मजूरांशी संवाद

0
13

गोंदिया,दि.१७ : रोजगार हमी योजना विभागाच्या केंद्र सरकारच्या अतिरिक्त सचिव अपराजिता सारंगी यांनी १६ व १७ मे रोजी जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांना भेटी देवून कामाची पाहणी केली व योजनेच्या कामावर उप‍स्थित मजूरांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, रोहयो आयुक्त ए.एस.आर.नायक, रोहयोचे उपायुक्त केएनके राव, श्री.फुटाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र भांडारकर यांची उपस्थिती होती.
तिरोडा तालुक्यातील नवेगाव येथील सुरू असलेल्या पांदन रस्त्याच्या कामाची पाहणी केली. बिहिरीया येथे सुरू असलेल्या पांदण रस्त्याच्या कामाची पाहणी करून कामावर उपस्थित मजूरांशी संवाद साधला.या कामावर तुम्हाला किती मजुरी मिळते, किती तास काम करता, विश्रांतीची वेळ कोणती, ९० दिवस तुम्ही रोहयोच्या कामावर काम करीत असाल तर किती योजनांचा तुम्हाला लाभ मिळतो. रोहयोतून किती जणांच्या घरी गुरांचे व बकऱ्यांचे गोठे बांधण्यात आले आहेत, हा कार्यक्रम कसा सुरू आहे असे अनेक प्रश्न श्रीमती सारंगी यांनी उपस्थित मजूरांना विचारले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आमच्या उपजिविकेचा प्रश्न सुटला असून ही योजना आमच्यासाठी आधार असल्याचे कामावरील मजूरांनी श्रीमती सारंगी यांना सांगितले. यावेळी त्यांनी या योजनेतून सुरतीलाल रहांगडाले या लाभार्थ्याच्या घरी बांधण्यात आलेल्या गुरांच्या गोठयाची पाहणी केली. तसेच ग्रामपंचायतला भेट देवून रोहयोच्या कामाची कागदपत्रे बघितली. यावेळी सरपंच मदन बघेले उपस्थित होते.
गोंदिया तालुक्यातील धापेवाडा येथील रोपवाटिकेला भेट देवून लावण्यात आलेल्या रोपट्यांची पाहणी केली. देखरेखीअभावी तीन वर्षाच्या कालावधीत रोपट्यांची विशेष वाढ झाली नसल्यामुळे रोपवाटिकेतील रोपट्यांकडे ग्रामपंचायतीने विशेष लक्ष्य देण्याच्या सूचना यावेळी श्रीमती सारंगी यांनी केली.
गोरेगाव तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम पाथरीला भेट देवून या ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या भुताईटोला गावाजवळील रोहयोतून करण्यात आलेल्या माजी मालगुजारी तलावाच्या खोलीकरणाची तसेच रोहयोतून जगदिश बघेले या लाभार्थ्याच्या शेतात बांधण्यात आलेल्या विहिरीची देखील पाहणी केली. पाथरी येथील माजी मालगुजारी तलावाच्या खोलीकरणाची पाहणी केली. ग्रामपंचायत जवळील रोपवाटिका तसेच गावात काही ठिकाणी लाभार्थ्यांकडे करण्यात आलेल्या शोषखड्डयाचे देखील त्यांनी पाहणी करुन ग्रामपंचायतला भेट दिली. यावेळी पं.स.सदस्य केवल बघेले, सरपंच ममता जनबंधू तसेच ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुरदोली येथे वनविभागाने रोजगार हमी योजनेतून तयार केलेल्या रोपवाटिकेला श्रीमती सारंगी यांनी भेट देवून पाहणी केली व समाधान व्यक्त केले. या रोपवाटिकेसह जिल्ह्यातील अनेक रोपवाटिकेत स्वदेशी झाडांची रोपटे तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री.काळे यांनी दिली तसेच त्यांनी स्वदेशी जातीचे झाडे लावण्यामागची भूमिका विशद केली. त्यामुळे देशातील विविध राज्यातील रोपवाटिकेत मोठ्या प्रमाणात स्वदेशी झाडांची रोपटी तयार करणार असल्याचे श्रीमती सारंगी यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपवनसंरक्षक एस.युवराज, सहायक वनसंरक्षक श्री.शेंडे, तहसिलदार अरविंद हिंगे, गटविकास अधिकारी श्री.हरिणखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र भांडारकर, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.जाधव यांचेसह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आमगाव तालुक्यातील वळद येथील रोहयो कामाची पाहणी देखील श्रीमती सारंगी यांनी केली.