जोडगव्हान येथील महिला सरपंचाला न्याय हक्कापासून वंचित ठेवण्याचा डाव

0
7
आकाश पडघन
 वाशिम दि19 : मालेगाव तालुक्यातील जोडगव्हान येथील महिला सरपंच दलित असल्याने त्यांच्या हातून विकास कामे होऊ नये या आकस बुद्धीने  इतर सदस्यांनी परस्पर ठराव घेण्याचा सपाटा लावल्याचा आरोप महिला सरपंचानी केला आहे.   प्रभारी ग्रामसेवक गावात येत नसल्याने विकास कामांना खीळ बसली आहे.   नियमित ग्रामसेवक दयावा , तत्कालीन ग्रामसेवकांने केलेल्या 10 लाख 77 हजार 477  रुपयांच्या   अपहाराची  चौकशी  करावी आदी मागणीसाठी महिला सरपंच  रमा राहुल कांबळे यांनी आमरण उपोषणाचा इशारा निवेदनातून दिला आहे. जोडगव्हान येथे प्रभारी ग्रामसेवक नियमित येत नसल्याने मासिक मीटिंग व ग्राम सभा झाल्याच नाहीत. ठराव खुद्द महिला सरपंचांना अंधारात ठेवून घेतले जात आहेत.
महिला सरपंच केवळ दलित असल्याने त्यांच्या न्याय हक्कापासून त्यांना वंचित ठेवण्याचा डाव इतर सदस्यांनी आखला आहे.  ग्राम पंचायतीचे सर्व  सर्व रेकार्डसह सर्व योजनेचे धनादेश ग्रामसेवकांनी घरी नेले असल्याने गावाचा विकास खुंटला आहे.  14 व्या वित्त आयोग व पाणी पुरवठा योजना निधी तसाच पडून आहे. रोजगार हमी योजना आणि जन सुविधा योजने अंतर्गत  सरपंचाच्या खोट्या सह्या मारून  तत्कालीन ग्रामसेवक, ठेकेदार आणि धनादेश धारकांनी  संगनमत करून 10 लाख 77 हजार 477  रुपयांचा अपहार केला असल्याची तक्रार करूनही त्यांच्या तक्रारीला  प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे.  न्याय मागणीसाठी महिला सरपंच  कांबळे यांनी 28 मे ला आमरण उपोषणाचा इशारा  जिल्हाधिकारी ,मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.