गावक-यांनी जाळले नक्षलवाद्यांचे बॅनर

0
10
file photo

गडचिरोली,दि.22  – कसनासूर-बोरिया येथील चकमकीविरोधात १९ ते २५ मेदरम्यान नक्षलवाद्यांकडून शहीद सप्ताहानिमित्त बंद पुकारण्यात आला. यासंदर्भात काही ठिकाणी बॅनर व पत्रके टाकल्याने दहशतीचे वातावरण असले तरी कुमारगुडा फाटा येथे गावक-यांनी नक्षली बॅनरची होळी करून निषेध व्यक्त केला.नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी पत्रके आणि बॅनर लावून शहीद सप्ताह पाळण्याचे आवाहन केले. सोमवारी सायंकाळी पुन्हा आलापल्ली-भामरागड मुख्य मार्गावर नक्षलवाद्यांनी पत्रके आणि बॅनर बांधल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आलापल्ली-भामरागड मार्गावरील मौजा कुमारगुडा फाटा येथे नक्षल्यांनी लावलेले बॅनर गावकºयांनी काढून त्याची होळी केली. नक्षलवाद्यांच्या बंदच्या आवाहनाला कुमारगुडाच्या नागरिकांनी विरोध दर्शवून नक्षलविरोधी घोषणाही दिल्या. दरम्यान भामरागड तालुका मुख्यालयापासून ५ ते ६ किमी अंतरावर बॅनर आणि पत्रके आढळल्याने गडचिरोली-लाहेरी आणि नागपूर-भामरागड या दोन्ही बसगाड्यांना सोमवारी सायंकाळी माघारी फिरत ताडगाव पोलीस ठाण्यात बसेस जमा कराव्या लागल्या. नागपूर-भामरागड ही बस भामरागडला मुक्कामी येत होती. पण बस तेथूनच परत गेली.