कोदामेढीतील स्मशानभूमीला रस्त्याची प्रतीक्षा

0
15

‘पालकमंत्री साहेब, जरा स्वगावाकडे तर बघा!‘

सडक अर्जुनी,दि.२३- जीवनातील अंतिम सत्य म्हणजे मृत्यू. जिवंतपणी सोयीसुविधांचा वानवा असला तरी एकदाचे चालेल, मात्र जीवनाच्या अंतिम प्रवासात तर किमान त्रास नसावा, ही साधी आणि रास्त अपेक्षा बाळगण्यात काय गैर असणार. त्यातही मंत्रिमहोदयांच्या गावात लोकांना आपले आप्तेष्ट, जिवलग आणि स्वजणांच्या अंतिम प्रवासात सुद्धा हालअपेष्टा सहन कराव्या लागत असतील तर त्याहून वेगळे दुर्दैव कोणते? परिणामी, ‘पालकमंत्री साहेब, जरा गावाकडे तर लक्ष द्या आणि कोदामेढीतील स्मशानभूमीला जाणाèया रस्त्याचे बांधकाम करून द्या‘, अशी मागणी खुद्द ना. बडोले साहेबांच्या गावातून होत आहे.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील कोदामेढी या जन्मगावातील नागरिकांनाच स्मशानभूमीकडे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही. यामुळे वळणाच्या पाणंद रस्त्याने स्मशानभूमीपर्यंत जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पालकमंत्र्यांचे गाव म्हटले की, गावात विकासाची गंगा वाहणार असे कुणालाही साहजिकच वाटणार. तसेही ना. राजकुमार बडोले हे दुसèयांदा या मतदारसंघाचे आमदार आहेत. गेल्या ९ वर्षापासून आमदार असतानाही आपल्या गावातील स्मशानभूमीकडे जाणारा एक चांगला रस्ता ते देऊ शकले नाही, यावरुन त्यांचे आपल्या गावाच्या विकासाकडे किती चांगले लक्ष आहे, हे दिसून येत आहे.
गावापासून लांब आणि घाटबोरीतेलीकडे जाणाèया मुख्य रस्त्यापासून लागलेल्या झुडपी जंगलात जवळपास २ ते ३ किलोमीटर अंतरावर स्मशानभूमी आहे. कच्चा रस्ता आणि तो सुद्धा खड्डेयुक्त अशा परिस्थितीत उन्हाळ्याच्या दिवसात तर एकदाचे ठीक आहे, पण पावसाळ्यात या रस्त्याने अंत्ययात्रा कशापध्दतीने जात असेल, याची कल्पना हा रस्ता बघितल्यावर येते. आजही येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता व्यवस्थित नाही. दिवसाच्या प्रकाशात सुद्धा धड चालता येत नाही. त्यातही सायंकाळी व रात्रीच्या वेळी तर आणखी वाईट परिस्थिती असते. या मार्गावर लाइट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंत्ययात्रेसाठी जाताना व स्मशानभूमीच्या प्रेताग्नीच्या ठिकाणी आजही पेटड्ढोमॅक्स, बॅटरी आणि मोबाईल फ्लॅशच्या उजेडाचा आधार घ्यावा लागत आहे. एका नाल्याच्या काठावर असलेल्या या स्मशानभूमीचे बांधकाम ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले आहे. विद्यमान ग्रामपंचायतीचे पदाधिकारी स्मशानभूमीकडे रस्ता व्हावा, यासाठी प्रयत्न करतात. परंतु, विकासाच्या मोठमोठ्या बढाया मारणारेच यात आडकाठी आणत असल्याचा आरोप आता नागरिक करू लागले आहेत.