भय्यूजी महाराजांची आत्महत्या; स्वत:वर गोळी झाडून संपवले जीवन

0
9

इंदूर,दि.12(वृत्तसंस्था): संत भय्यू महाराज यांनी मंगळवारी दुपारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, भय्यूजी महाराज यांनी राहात्या घरी गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तिथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. काही महिन्यापूर्वीच मध्यप्रदेश सरकारने त्यांना मंत्रीपदाचा दर्जा दिला होता, मात्र त्यांनी तो नाकारला होता.

महाराष्ट्राच्या राजकारणात भय्यूजी महाराजांचा बराच बोलबाला होता. राजकारणात अनेकदा यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी भय्यूजी महाराज ओळखले जायचे. गुजरातमधले नरेंद्र मोदींचे सद्भवना उपोषण भय्यूजींच्या मध्यस्थीनेच सोडवण्यात आले होते. तर अनेकदा किचकट प्रश्न सोडवण्याकरता राजकीय नेते भय्यूजी महाराजांना मध्यस्थीची विनंती करायचे. मराठा आरक्षणसाठीच्या मोर्चामागे भय्यूजी महाराज असल्याच्याही चर्चा होत्या
भय्यूजी महाराज यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधले जाते. अध्यात्मिक क्षेत्रात ते प्रसिद्ध आहेत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ते सक्रीय असतात. राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांसोबत त्यांची उठबस असते.काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत.
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख, शरद पवार, लता मंगेशकर, उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, मिलिंद गुणाजी इत्यादी अनेक दिग्गज भय्यू महाराजांच्या आश्रमात जाऊन आले आहेत.

भय्यू महाराज यांनी काही महिन्यांपूर्वी दुसरं लग्न केलं होते.

भय्यूजी महाराज यांचे नाव उद्यसिंह देशमुख होते. इंदूरमधील बापट चौकात त्यांचा आश्रम आणि ट्रस्ट आहे. येथूनच त्यांचे सामाजिक कार्य चालत होते.
– भय्यूजी महाराज यांच्या पहिल्या पत्नीचे नाव माधवी निंबाळकर होते, त्यांचे माहेर मराठवाड्यातील होते. माधवी यांच्या निधनानंतर भय्यूजी महाराज यांनी ग्वाल्हेर येथील डॉ. आयुषी शर्मासोबत दुसरे लग्न केले होते. पत्नी आयुषी सोबत ते आश्रमात राहात होते. – पहिली पत्नी माधवीपासून त्यांना कुहू नावाची मुलगी आहे. ती सध्या पुण्यात शिक्षण घेत आहे.