शासकीय तांदूळ प्रकरणात सहा राईस मिलर्सवर गुन्हा दाखल

0
11

भंडारा,दि.१३ः- धानाची भरडाई करून तांदूळ शासकीय गोदामात जमा न करता परस्पर विल्हेवाट लावून शासनाची १२ कोटी २0 लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी वरठी व मोहगाव देवी येथील सहा राईस मिलर्सविरोधात वरठी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. राजू कारेमोरे, रामेश्‍वर कारेमोरे, माणिकराव कारेमोरे, विजय कारेमोरे, मॉ भगवती राईस मिल मोहगाव देवीचे मालक व गुरुदेव हटवार या वरठी व मोहगाव देवी येथील गुन्हे दाखल झालेल्या राईस मिलर्सची नावे आहेत. विशेष म्हणजे याप्रकरणात गोंदियातील काही राईस मिलमालकांचाही समावेश आहे.त्यांच्यावर मात्र अद्यापही कारवाई झालेली नाही.हे प्रकरण बेरार टाईम्सने सातत्याने समोर आणले होते.
सरकारकडून राईस मिलर्सना धान भरडाईकरीता दिला जातो. राईस मिलर्स या धानाची भरडाई करून तयार झालेला तांदूळ भारतीय खाद्य महामंडळाकडे जमा करतात. सन २0११-१२ च्या खरीप हंगामापासून ते आतापर्यंत वरठी व मोहगाव देवी येथील या राईस मिलर्सना धान भरडाईसाठी देण्यात आला होता. परंतु, राईस मिलर्सनी तयार केलेला तांदूळ महामंडळाच्या गोदामात जमा केला नाही. नियमानुसार, राईस मिलर्सनी भरडाई केलेला ६७ टक्के तांदूळ महामंडळाच्या गोदामात जमा करणे आवश्यक असताना या तांदळाची अन्यत्र विल्हेवाट लावली. त्यामुळे ६२ हजार ९९६.२१ क्विंटल तांदळाचा अपहार करण्यात आला. त्यातून या राईस मिलर्सनी शासनाची १२ कोटी २0 लाख ९६ हजार रुपयांनी फसवणूक केली आहे.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर जिल्हा पणन अधिकारी गणेश खडसे यांनी वरठी पोलिसात तक्र ार केली. पोलिसांनी सदर राईस मिलर्सविरोधात भादंविच्या कलम १२0 (ब), ४0६, ४0८, ४0९, ४२0, ४३४, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हे नोंदविले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक ढोबळे करीत आहेत.