बहुजन समाजात फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न-प्रकाश आंबेडकर

0
9

मुंबई दि.१४ः: हिंदू-मुस्लीम समाजात दंगली घडवण्यात अपयश आल्याने आरक्षणवादी व आरक्षणविरोधी या बहुजन गटांत सरकार दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. एल्गार परिषदेच्या नेत्यांना होणाऱ्या अटकेसंदर्भात खुलासा करण्यासाठी आंबेडकर यांनी पक्ष कार्यालयात बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात सरकारकडून देशात दंगली घडवून अराजकता माजवत आणीबाणी आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आंबेडकर म्हणाले की, मनोहर कुलकर्णी-भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना वाचवण्यासाठी एल्गार परिषदेच्या नेत्यांना अटक केली जात आहे. मुळात एकबोटे आणि भिडे यांच्याविरोधात पुरावे नसल्याचे कारण देत क्लीन चिट देणाºया सरकारने एल्गार परिषदेच्या नेत्यांविरोधात कोणते पुरावे मिळाले, ते सादर करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच एल्गार परिषदेचा कोरेगाव भीमा दंगलीशी काय संबंध आहे? त्याचा खुलासाही सरकारने करण्याचे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.
मुळात देशभरातील पोटनिवडणुकांसह विधानसभेच्या काही निवडणुकांत सरकारविरोधात जनमत जात असल्याचे दिसत आहे. म्हणूनच निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सरकारकडून सातत्याने दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्यात अपयश आल्याने आता सरकार बहुजन समाजातच फूट पाडून दंगली घडवू पाहत आहे जेणेकरून देशात अराजकता माजून आणीबाणी घोषित करता येईल. एकदा आणीबाणी घोषित झाली की निवडणुका मे महिन्यापर्यंत पुढे ढकलता येतील, असा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे.एल्गार परिषदेचा कोरेगाव भीमा दंगल किंवा माओवाद्यांशी काहीही संबंध नाही. मात्र तपास यंत्रणांनी कोणत्याही पुराव्यांअभावी तथाकथित पत्रांचा संदर्भ माओवाद्यांशी जोडला आहे.