‘नीट’मध्ये त्या २४ विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त गुण

0
9

नागपूर,दि.16 : ‘नीट’ परीक्षा अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पेपर सोडविण्यास ३० मिनिटे कमी वेळ मिळालेल्या २४ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)ला दिला. या निर्णयामुळे पीडित विद्यार्थ्यांच्या विरोधात भूमिका घेणाºया मंडळाला जोरदार दणका बसला. न्यायालयाने मंडळाला त्यांच्या कर्तव्याची जाणीवही करून दिली.
हुडकेश्वर येथील आदर्श संस्कार विद्यालयातील खोली क्र. ३९ मध्ये रोल नंबर असणाºया २४ विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी १८० पैकी केवळ १५० मिनिटे मिळाल्याचा दावा न्यायालयाने मान्य केला. अशा प्रकरणात विद्यार्थ्यांना कशाप्रकारे अतिरिक्त गुण द्यायचे याचे सूत्र सर्वोच्च न्यायालयाने ‘दिशा पांचाळ’ प्रकरणावरील निर्णयात ठरवून दिले आहे. उच्च न्यायालयाने त्यांच्यासमक्ष असणाºया २४ विद्यार्थ्यांना या सुत्रानुसार अतिरिक्त गुण देण्यास सांगितले. ही कार्यवाही पूर्ण करून विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका वाटप करण्यासाठी सीबीएसईला २२ जूनपर्यंत मुदत देण्यात आली. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाची पहिली फेरी १८ जून रोजी संपणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा सुधारित गुणाच्या आधारावर दुसºया फेरीमध्ये विचार करण्यात यावा असे निर्देश न्यायालयाने दिले. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी हा निर्णय दिला. १२ जून रोजी प्रकरणावर अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. यासंदर्भात वैष्णवी मनियार या विद्यार्थिनीने रिट याचिका दाखल केली होती. तिची याचिका मंजूर झाली. तिच्यामुळे इतर विद्यार्थ्यांचाही फायदा झाला. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, अ‍ॅड. रोहण चांदुरकर व अ‍ॅड. मुग्धा चांदुरकर, आदर्श विद्यालयातर्फे अ‍ॅड. अनिल किलोर, सीबीएसईतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सी. एस. कप्तान व पृथ्वीराज चव्हाण तर, सरकारतर्फे अ‍ॅड. एन. आर. पाटील यांनी कामकाज पाहिले.