जिवंत विद्युत तारेच्या संपर्काने चार जनावरांचा मृत्यू

0
8

गोंदिया,दि.21 : विद्युत खांबाच्या सुरक्षा तारेत आलेल्या विज प्रवाहाच्या संपर्कात आल्याने चार जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना  (दि.२0) सायंकाळी ४ वाजता तांडा येथे घडली. या घटनेत दोन म्हैस, एक रेडा व एक बैलाचा मृत्यू झाला असून पशुपालकाचे जवळपास १ लाख २५ हजाराचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती सरपंच मुनेश रहांगडाले यांनी विद्युत विभाग, पोलिस स्टेशन व पशु वैद्यकीय अधिकार्‍याला दिली आहे.
नजिकच्या तांडा येथील सुरेश शेंडे, तिलकचंद हरिणखेडे, देवसिंग बघेले, नरेंद्र रहांगडाले या पशुपालक शेतकर्‍यांचे जनावरे शेतशिवाराकडे चरण्यासाठी गेले होते. सायंकाळी ४ वाजता सुमारास घरी परत येत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाच्या सुरक्षा तारेला विद्युत प्रवाह असल्याने चार जनावरांचा मृत्यू झाला. तर काही जनावरे थोडक्यात बचावली. या घटनेत चारही शेतकर्‍यांचे १ लाख २५ हजार रूपयाचे नुकसान झाले. या घटनेची माहिती सरपंच रहांगडाले यांनी पोलिसांसह विद्युत विभागाला दिली आहे. ही घटना विद्युत विभागाच्या लापरवाहीमुळे घडल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. उल्लेखनिय असे की, चार दिवसांपूर्वी त्याच ठिकाणी एका बैलाचा विद्युत प्रवाहाने मृत्यू झाला होता. नुकसानग्रस्त पशुपालकांना संबधित विभागाकडून मदत करण्यात यावी, अशी मागणी सरपंच रहांगडाले यांनी केली आहे.