पीककर्ज मंजुरीसाठी बँक अधिकार्‍याने शेतकर्‍याच्या पत्‍नीला केली शरीरसुखाची मागणी

0
10

बुलडाणा,दि.22ः- पीक कर्ज मंजूर करून देण्‍यासाठी बँक अधिका-याने शेतक-याच्‍या पत्‍नीकडे शरीरसुखाची मागणी केल्‍याचा संतापजनक प्रकार मलकापूर येथे घडला आहे. येथील दाताळा गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्‍या शाखाधिका-याविरूद्ध याप्रकरणी गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. एकीकडे नापिकी, वाढते कर्ज यामुळे शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या वाढत असताना बँक अधिका-याच्‍या अशा घृणास्‍पद आणि असंवेदनशील कृत्‍यामुळे संताप व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.दाताळा गावातील शेतकरी पिक कर्जासाठी गावातीलच सेंट्रल बँकेच्‍या शाखेत गुरूवारी गेले होते. त्‍यावेळी शेतक-याची कागदपत्र तपासून बँक व्‍यवस्‍थापकाने तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना केली. यावर शेतक-याने आपल्‍या पत्‍नीचा नंबर त्यांना दिला. नंतर शाखाधिका-याने या नंबरवर फोन करून शेतकरी पत्‍नीशी अश्‍लील संभाषण केले व शरीर सुखाची मागणी केली. एवढेच नव्‍हे तर यासाठी पिककर्जासोबत वेगळे पॅकेजही देण्‍यात येईल, असा निरोप शिपायामार्फत महिलेला पाठविला.

मोबाईलवरील सर्व संभाषणाचे महिलेने रेकॉर्डिंग करून ठेवले होते. त्‍यानूसार मलकापूर ग्रामीण पोलिसात गुरूवारी याविषयी त्‍यांनी तक्रार दिली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुरूवारी रात्री शाखाधिकारी राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्‍हाण यांच्‍याविरोधात विविध कलमांतर्गत तसेच अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वयेही गुन्हा दाखल केला. गुन्‍हा दाखल होताच दोन्‍ही आरोपी फरार झाले आहेत. पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी गिरीश बोबडे करत आहेत.