‘किडनी चोर’ समजून एका निष्पाप युवकाचा बळी

0
26

गोरेगाव,दि.२३ :मागील काही महिन्यांपासून गोंदिया जिल्ह्यासह नजिकच्या छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्यात सोशल मिडियावर मुलांना चोरी करणारी व किडनी चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा पसरविली जात आहे. या अफवांच्या नादात गोंदिया जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये निष्पाप लोकांना मारहाण करण्यात आली. त्यातच काल (ता.२१) गोरेगाव तालुक्यातील तानुटोला येथे २0 ते २१ वर्षीय अनोळखी युवकाला सामूहिक मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, या घटनेने जिल्ह्याला अफवांच्या नादात कलंकही लावले आहे. दरम्यान पोलिसांनी २0 ते २५ अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ह्यात व परिसरात मागील काही दिवसांपासून किडनी चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. अशी अफवा सोशल मिडियावर व्हायरल केली जात आहे. एवढेच नव्हे तर सोशल मिडियावर बोगस छायाचित्र तसेच व्हिडिओ व्हायरल करून सत्य घटना दर्शविण्याचे प्रयत्न केले जात आहे. या अफवांच्या नादात गोंदिया जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून व्यवसायासाठी भटकंती करीत असलेले तसेच मनोरुग्णांनाही मारहाण करण्यात आली आहे. त्यातच गोरेगाव तालुक्यातील तानुटोला येथे २१ जून रोजी एका युवकाला सामूहिक मारहाण करून त्याचा मुडदा पाडला. या घटनेचे चित्रफित सोशल मिडीयावर व्हायरलही झाले आहे.
पोलिस या या चित्रफिताची तपासणी करीत आहे. तसेच अफवांना बळी न पडता कायद्या हातात न घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले जात आहे. माहितीनुसार तानुटोला शिवारातील जंगलात मृतक अनोळखी युवक हा काही लोकांना भटकंती करताना दिसून आला. दरम्यान, त्याची काहीही विचारपूस करण्याआधीच नागरिकांच्या जमावाने त्या युवकाला पकडले. दरम्यान, काठी, रॉड, लोखंडी सळाख, विटा, दगड व लाथा-बुक्क्यांनी सामूहिक मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेत जखमी झालेल्या युवकाला उपचारासाठी गोरेगावात आणण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद गोरेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली असून २0 ते २५ अज्ञात मारेकर्‍याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत किडनी चोरांच्या अफवांत निष्पाप युवकाचा बळी गेला, अशीच म्हणण्याची वेळ आली आहे.