मुंबई ‘शिक्षक’मध्ये कपिल पाटील व ‘पदवीधर’मध्ये शिवसेनेचे पोतनीस विजयी

0
14

मुंबई, दि. २८ : –महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांसाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघातून लोकतांत्रिक जनता दल (लोकभारती) चे उमेदवार कपिल पाटील यांनी विजय खेचून आणला आहे. मात्र, त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पहिल्या फेरीत 4 हजार 500 मतांनी कपिल पाटील यांनी विजयी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे मुंबई पदवीधरमधून शिवसेनेचे उमेदवार विलास पोतनीस यांनी पहिल्या फेरीत 20 हजार मतांपैकी 11 हजार मते विजयी घौडदौड सुरू केली आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार संदीप बेडसे यांच्यावर सुमारे 6 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी पहिल्या फेरीअखेर शिवसेनेचे संजय मोरे यांच्यापेक्षा सुमारे 900 मतांची आघाडी घेतली आहे. डावखरे व मोरे यांच्यातील अंतर खूपच कमी असल्याने तेथे कॉटे की टक्कर पाहायला मिळत आहे.कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्यापुढे आपली जागा राखण्याचा दबाव असेल त्यामुळे त्यांची धाकधुक वाढली आहे.सोमवारी 25 जून रोजी मुंबई व कोकण पदवीधर आणि कोकण व नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी मतदान झाले. मुंबई पदवीधर मतदारसंघात 53 टक्के, मुंबई शिक्षक मतदारसंघात 83 टक्के, कोकण पदवीधर मतदारसंघात 73 टक्के तर नाशिक शिक्षक मतदारसंघात 92 टक्के इतके मतदान झाले होते.