अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी राजीव जवळेकर निलंबित

0
16

गडचिरोली,दि.30:जलयुक्त शिवाय योजनेंतर्गत माजी मालगुजारी तलावांच्या खोलीकरणाच्या कामात आर्थिक गैरप्रकार केल्याप्रकरणी राज्य शासनाने जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी राजीव जवळेकर यांना  निलंबित केले आहे.जलयुक्त शिवार योजना ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीपासूनच या योजनेच्या कामावर बारिक लक्ष ठेवून आहेत.त्यामुळे या कामात गैरव्यवहार करणारे अधिकारी सरकारच्या रडारवर आहेत. गडचिरोली जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे हाती घेण्यात आली आहेत. कुरखेडा तालुक्यात २३ माजी मालगुजारी तलावांतील गाळ उपसण्याचे काम करण्यात आले होते. मात्र, या कामात प्रचंड डिझेल खरेदीची अवास्तव बिले जोडणे व अन्य आर्थिक गैरप्रकार झाल्याचे चौकशीअंती आढळून आल्याने राज्य शासनाने  अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी राजीव जवळेकर यांना निलंबित केले. त्यांच्या निलंबनाचा आदेश आज जिल्हा परिषदेत धडकल्यानंतर एकच खळबळ उडाली.

आर्थिक गैरप्रकारामुळे निलंबित व्हावे लागण्याची राजीव जवळेकर यांची तीन वर्षांतील ही दुसरी वेळ आहे. २०१५ मध्ये श्री.जवळेकर हे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी असताना तेथे संगणक खरेदीत ६८ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला होता. हा गैरव्यवहार तसेच अनेक कामांना दिलेली बेकायदेशीर प्रशासकीय मान्यता या कारणांसाठी तेव्हा जवळेकर यांना निलंबित करण्यात आले होते. काही काळ निलंबित राहिल्यानंतर त्यांना गडचिरोली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून पदावनत करण्यात आले.