महादेव जानकर यांचा आमदारकीचा राजीनामा

0
8

नागपूर,दि.97 : विधान परिषदेच्या १६ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता अर्ज दाखल करणारे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी भाजपाच्या वतीने यापूर्वी मिळवलेल्या आमदारकीचा राजीनामा दिला. मात्र, राजीनामा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी दिला की नंतर दिला, यावरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गुरुवारी सकाळी आपण आमदारकीचा राजीनामा दिल्याचा दावा खुद्द जानकर यांनी केला आहे. मात्र त्यांचा राजीनामा स्वीकारण्याची घोषणा शुक्रवारी विधान परिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी केली. जानकर यांचा राजीनामा गुरुवारी रात्री त्यांना प्राप्त झाला होता. जानकर यांनी भाजपाचे सदस्य असताना रासपाच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला असेल तर त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई होऊ शकते, अशी कुजबूज विधिमंडळ परिसरात शुक्रवारी सुरू होती.
जानकर यांनी भाजपाच्यावतीने पुन्हा विधान परिषदेवर जावे याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अनेक नेत्यांनी त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र जानकर यांनी त्याला धूप घातली नाही. त्यावेळी मी भाजपाचा सदस्य झालो ही घोडचूक होती, असे त्यांनी भाजपा नेत्यांना सुनावले. रासपाचा उमेदवार म्हणून आपल्याला संधी मिळावी, असा आग्रह धरला. भाजपाला सध्या मित्र पक्षाची गरज आहे. जानकर यांना रासपाचे उमेदवार म्हणून परिषदेवर पाठवले नाही तर भाजपाला मित्रपक्षांना सांभाळता येत नाही, असा आरोप होईल. तसेच तांत्रिक बाबीमुळे आरक्षण न मिळाल्याने अगोदरच नाराज असलेला धनगर समाज नाराज होण्याची भीती भाजपाला वाटत आहे.  जानकर यांच्या आग्रहामुळे भाजपा कात्रीत सापडला आहे.