आ. राम पा. रातोळीकर यांचा आज भाजपच्या वतीने सत्कार सोहळा

0
9

नांदेड (प्रतिनिधी),दि.11ः- महाराष्ट्र विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर नांदेड जिल्हा भाजप (ग्रामीण)चे अध्यक्ष आ. राम पाटील रातोळीकर यांचे आज ११जुलै रोजी नांदेडमध्ये प्रथमच आगमन होत आहे. यानिमित्त भाजपच्यावतीने त्यांच्या स्वागत आणि सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
११जुलै रोजी बुधवारी सकाळी आ. राम पा. रातोळीकर यांचे नागपूरहून नांदेडला आगमन होणार आहे. सकाळी श्री सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारा येथे दर्शन घेतल्यानंतर ते नांदेड शहरातील राष्ट्र पुरुषांच्या पुतळ्यांचे दर्शन घेणार आहेत सकाळी १० वाजता जुना मोंढा (टॉवर) येथे रविंद्रनाथ टागोर, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते म. गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले आणि अण्णा भाऊ साठे, महाराणा प्रतापसिंह या राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्यांनाही अभिवादन करणार आहेत.
या नंतर, सकाळी ११:३० वाजता नांदेड भाजपच्यावतीने आनंदसागर मंगल कार्यालय, आसनापूलाजवळ सांगवी येथे त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पक्षाच्या सर्व स्थानिक पदाधिकारी,मंडळ अध्यक्ष, कार्यकर्त्यांनी तसेच सर्व आघाड्यांच्या प्रमुखांनी सकाळी १० वाजता जुना मोंढा येथे उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. संतुकराव हंबर्डे व जिल्हा सरचिटणीस माधव अण्णा साठे यांनी केले आहे.