शिवसेना आमदारांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न

0
6

नागपूर,दि.११ : – कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ घातला. नाणार प्रकल्पाविरोधात भूमिका मांडण्याची संधी नाकारल्याने संतापलेल्या शिवसेना आमदारांसह काँग्रेसचे नितेश राणे यांनीही चक्क राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. राजदंड सोडवण्याच्या प्रयत्नात झटापट होऊन विधानसभाध्यक्षांचे चोपदार आणि काही आमदारही अक्षरशः खाली पडले. या अभूतपूर्व गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.

विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू केलेल्या चर्चेला विधानसभेत मंत्र्यांकडून उत्तर देणे सुरू होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे उत्तर पूर्ण झाल्यावर कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत उत्तर देण्यासाठी उभे झाले. त्याच वेळी शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी नाणार प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा विधान भवनावर आला असल्याने नाणारबद्दलची भूमिका मांडण्यासाठी बोलण्याची संधी मिळावी, अशी मागणी केली. या मागणीला अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नकार दिला. मंत्र्यांचे उत्तर सुरू असताना मध्येच अशी परवानगी देता येणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिली. त्याच वेळी काँग्रेसने आमचा नाणारविषयी प्रस्ताव असल्याने त्याला प्राधान्य मिळावे, असे सांगत शिवसेना आमदारांच्या मागणीला विरोध दर्शवला. मात्र, नाणारबद्दल बोलण्यासाठी संधी दिलीच पाहिजे, असा हट्ट धरत शिवसेना आमदारांनी अध्यक्षांच्या आसनाजवळ गोंधळ घालायला सुरुवात केल्याने सभागृहाचे कामकाज सुरुवातीला दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. त्यानंतर तब्बल चारदा सभागृह तहकूब झाले.