पोलीस पाटलांच्या मानधनाबाबत एक महिन्यात निर्णय- डॉ. रणजित पाटील

0
19

नागपूर, दि. 18 : पोलीस पाटील हा घटक ग्रामीण भागात महत्वाचा घटक आहे. तो गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे महत्वाचे काम करीत आहे, पोलीस
पाटील यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून येत्या महिनाभरात त्यांच्या मानधनात वाढ करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम 93 अन्वये सूचना मांडली होती,सूचनेला उत्तर देताना डॉ. पाटील बोलत होते. ते म्हणाले, कोतवालांना चतुर्थश्रेणी दर्जा देण्याबाबत व त्यांना तो दर्जा द्यावयाचा झाल्यास कोतवालाप्रमाणे इतर मानधनावर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या (पोलीस पाटील, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका) मागण्यांचा एकत्रित विचार करून त्यांना सामाजिक सुरक्षा प्राप्त होण्यासाठी ‘एकछत्र योजना’ आणण्याचा शासन विचार करीत आहे. मानधन वाढीबाबतच्या वित्त विभागाच्या समितीचा अंतिम
अहवाल शासनाला प्राप्त झालेला आहे. अहवालातील शिफारशींचा विचार करून येत्या महिनाभरात मानधन वाढीबाबत निर्णय घेण्यात येईल.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतीसाठी उत्पन्नमर्यादा 6 लाखावरुन 8 लाख – राज्यमंत्री दिलीप कांबळे
नागपूर, दि. 18 : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतीसाठी आजपासूनच उत्पन्न मर्यादा 6 लाखावरुन 8 लाख रुपयांपर्यंत करण्याची घोषणा अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानपरिषदेत केली.  सदस्य ख्वाजा बेग यांनी विधानपरिषदेत नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना श्री. कांबळे म्हणाले, मुस्लिम समाजाच्या विविध योजनांसाठी लवकरच संचालनालय स्थापन करण्याची कार्यवाही करण्यात येईल. अल्पसंख्याक महिलांसाठी महामंडळांच्या मार्फत मदत केली जाईल. शासन अल्पसंख्याकांच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहिल. या चर्चेत सदस्य सर्वश्री जोगेंद्र कवाडे, हरिभाऊ राठोड, गिरीश व्यास, हुस्नबानू खलिफे, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सहभाग घेतला.