अटल विश्वकर्मा सन्मान योजनेसाठी गोंदिया तालुक्यात मेळाव्याचे आयोजन

0
6
गोंदिया,दि.23 : कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या वतीने गोंदिया  तालुक्यात ठिकठिकाणी अटल विश्वकर्मा सन्मान योजनेच्या लाभासाठी तथा मार्गदर्शनासाठी मेळाव्यांचे आयोजन  23 जुलै ते ३१ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. तालुक्यातील कामगार बंधुनी मोठ्या संख्येत मेळाव्यात उपस्थित राहून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जि.प.माजी उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले आहे.
केंद्र शासनाकडून अटल विश्वकर्मा सन्मान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत कामगार बंधू करीता अर्थसहाय्य देण्यात येत आहे. योजनेत पात्र ठरलेल्या कामगारांना वैद्यकीय उपचार, अवजार खर्च, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, मुलीच्या लग्नाकरीता आर्थिक मदत आदि सहाय्यच्या बाबी अंतर्भुत आहेत. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त कामगारांना मिळावा, यासाठी गोंदिया तालुक्यातील आसोली येथे २३ जुलै रोजी, कामठा येथे २४ जुलै, रजेगाव येथे २५ जुलै, काठी येथे २६ जुलै रोजी, दासगाव येथे २७ जुलै रोजी, रतनारा येथे ३० जुलै रोजी व तांडा येथे ३१ जुलै रोजी कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार असून योजनेच्या संदर्भात मार्गदर्शन आणि कागदपत्रांची पुर्तता करण्यात येणार आहे.  या योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी फी २५ रुपये एवढी आहे. वर्गणी दरमहा १ रुपया फक्त पाच वर्षाकरीता केवळ ६० रुपये वर्गणी आहे. नोंदणीकरीता पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत. गेल्या वर्षभरात ९० किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, रहिवासी पुरावा, छायाचित्रासह ओळखपत्र पुरावा, बँक पासबुकची सत्यप्रत व पासपोर्ट आकाराची ३ छायाचित्रे नोंदणीसाठी आवश्यक आहेत. मेळाव्यात मोठ्या संख्येने कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ९३२५३२६५०५ या क्रमांकावर संपर्क करावे, असेही कळविण्यात आले आहे.