जादूटोण्याच्या संशयातून चौघांवर कोयत्याने हल्ला

0
11

भंडारा,दि.27: जादूटोण्याच्या संशयावरून एकाच परिवारातील चौघांवर कोयत्याने हल्ला करण्याची घटना तालुक्यातील रोहणा येथे रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात पती-पत्नीसह दोन मुले गंभीर जखमी झाली असून आरोपीला रात्रीच अटक करण्यात आली.
दर्शन केवट (६०), पत्नी पुस्तकला दर्शन केवट (५०), लहू दर्शन केवट (२४) आणि शिवलाल दर्शन केवट (२२) अशी जखमींची नावे आहेत. तर नरहरी वळगुजी बुधे (४०) असे आरोपीचे नाव आहे. दर्शन केवट आणि नरहरी बुधे यांच्यात जादूटोण्याच्या संशयावरून नेहमीच वाद होत होता. दर्शन हा बुधे परिवारावर जादूटोणा करीत असल्याने त्याच्यावर संकट येत असल्याचा त्याचा ठाम समज होता. यातूनच रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास पुन्हा वाद झाला. या वादात आरोपी नरहरीने कोयत्याने दर्शनवर सपासप वार केले. त्याला वाचविण्यासाठी पत्नी पुस्तकला, मुलगा लहू आणि शिवलाल धावले. परंतु आरोपीने त्यांच्यावरही कोयत्याने वार केला. आरडाओरडा झाल्याने गावातील नागरिक घटनास्थळी धावून आले. संधीचा फायदा घेत आरोपी नरहरी मात्र पसार झाला.
घटनेची माहिती मोहाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आरोपीचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले. अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी कदम, उपनिरीक्षक थेरे, पोलीस शिपाई जगन्नाथ गिरीपुंजे, मिथून चंदेवार, सुनील केवट, पवन राऊत, हुकूमचंद आगाशे करीत आहे.