तब्बल 550 पक्ष्यांना मराठी नावं, महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचा उपक्रम

0
23

पुणे : मराठी भाषेत पक्ष्यांची प्रामणनावे असावीत यासाठी महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. राजू कसंबे यांनी पुढाकार घेतला आहे. डॉ. कसंबे यांनी तब्बल 550 पक्ष्यांना मराठी नावं देऊन बारसे केले आहे. महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना आणि बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

टिकल्स ब्लू फ्लायकॅचर, ब्लॉसम हेडेड पॅरॅकिट, चेंजेबल हॉक ईगल अशा काहीशा उच्चारायला कठीण जाणाऱ्या नावांपेक्षा मराठी भाषेतही पक्ष्यांची प्रमाणनावे असावीत, असा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे डॉ. कसंबे सांगतात.

काही दिवसांपूर्वीच पक्ष्याच्या मराठी नावाची अंतिम यादी तयार करण्यात आली असून राज्यातील पक्षी अभ्यासकांकडून सूचना मागविण्यात येणार आहेत. शिवाय आगामी महाराष्ट्र पक्षी संमेलनामध्ये ही यादी पुस्तकरूपात प्रकाशित केली जाणार आहे.

‘महाराष्ट्रात पक्ष्यांवर अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. मात्र पक्ष्यांची नावांबाबत एकवाक्यता नसल्याचे दिसून येते. याचा अर्थ ती नावे चुकीची नाहीत; पण काही मूलभूत नियम तयार करून पक्ष्यांच्या मराठी नावांची आदर्श सूची तयार करता येईल का, या विचारातूनच मी हा उपक्रम हाती घेतला’, असे डॉ. कसंबे यांनी सांगितले.

डॉ. कसंबे यांनी प्रमाण नावांच्या यादीमध्ये स्थलांतरी, प्रदेशनिष्ठ, पाणवठ्यांवरील, जंगलातील अशी वर्गवारी केली आहे. यात ५४६ पक्ष्यांचा समावेश केला आहे. पक्ष्याचे गोत्र ठरवून सर्व प्रजातींना नावे दिली. पक्ष्याला मराठी नाव देताना शास्त्रीय नावाचा अर्थही समजून घेतला आहे.

मारुती चितमपल्ली लिखित पक्षीकोश, डॉ. सतीश पांडे, प्रमोद देशपांडे आणि निरंजन संत लिखित ‘बर्डस ऑफ महाराष्ट्र’ आणि बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या दक्षिण भारतातील पक्षी या पुस्तकांचे पक्ष्यांना नावं देताना संदर्भ घेतले आहेत, असे कसंबे यांनी सांगितले.