अंजनगावचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

0
15

अमरावती,दि.31 – अंजनगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कार्यरत पुरवठा निरीक्षकाला रेशन दुकानदाराकडून तीन हजारांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज मंगळवारी रंगेहाथ अटक केली. गजानन कृष्णराव शेटे (वय – ५५, रा. अकोट, जि. अकोला) असे, लाचखोर पुरवठा निरीक्षकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान तो एसीबीच्या जाळ्यात अडकला. गजानन शेटे हा अंजनगाव सुर्जी तालुका कार्यकक्षेतील एका रेशन दुकानदाराकडे दरमहा पैशांची मागणी करीत होता. त्यामुळे कंटाळून रेशन दुकानदाराने  २४ जुलै रोजी अकोला एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार, एसीबीने २५ जुलैला पडताळणी केल्यानंतर  ३१ जुलैला सापळा रचला. या सापळ्यात गजानन शेटे  अलगद अडकला. त्याच्याकडून लाचेपोटी घेतलेले तीन हजार रुपये जप्त करण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक तिडके, अकोला येथील उपअधीक्षक संजय गोरले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण, हेडकॉन्स्टेबल दामोदर, पोलीस नाईक सुनील राऊत, शिपाई संतोष दहीहंडेकर, राहुल इंगळे, सुनील येलोने, चालक प्रवीण कश्यप यांनी केली.तक्रारदाराच्या रेशन दुकानाची तसेच अभिलेखाची तपासणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यामार्फत न होऊ देण्यासाठी त्यांच्याकरिता तीन हजार हवेत, असे गजानन शेटे तक्रारदाराला सांगत होता. वारंवार पैसे देणे शक्य नसल्याने वैतागून रेशन दुकानदाराने त्याच्याविरुद्ध तक्रार दिली होती.