तलाठी परेश मैदमवारांना लाच घेताना अटक

0
6

चंद्रपूर,दि.03ः- भद्रावती तालुक्यातील घोडपेठ व कुडरार येथील सासर्‍याच्या शेतजमिनीला भोगवटदार वर्ग २ मधून भोगवटदार वर्ग १ मध्ये फेरफार करण्याकरिता घोडपेठ येथील तलाठय़ाने तक्रारकत्याकडून ६ हजार रुपये घेऊन सुध्दा परत १५00 रुपयाची मागणी केली. तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीवरुन तलाठी परेश विजयराव मैदमवार(३२) रा. भद्रावती यांना सापळा रचून १५00 रुपयाची लाच घेतांना रंगेहात पकडले. सदर कारवाई चंद्रपूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १ ऑगस्ट रोजी केली.
तक्रारकर्ता हा तालूक्यातील चालबर्डी(कोंढा) येथील रहिवासी असून त्यांच्या सासर्‍याची शेतजमीन घोडपेठ व कुडरार येथे आहे. सदर जमीन ही भोगवटदार वर्ग २ मध्ये असल्याने या जमिनीला भोगवटदार वर्ग १ मध्ये परावर्तीत करण्यासाठी तहसील कार्यालय भद्रावती येथे प्रकरण सादर करण्यात आले होते. सदर अर्जावरून तक्रारकर्त्यांचे सासर्‍यांकडून तलाठी परेश विजयराव मैदमवार यांनी फेरफार करण्याकरीता आधीच ६ हजार रुपये घेतले होते. मात्र तलाठय़ाने परत पैशांची मागणी केल्यामुळे तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांच्याकडे तक्रार केली. १ ऑगस्ट रोजी केलेल्या पडताळणी व कारवाई दरम्यान आरोपी परेश मैदमवार यांनी फिर्यादीच्या सासर्‍याचे शेतजमिनीचे फेरफार उतारे देण्याकरीता यापूर्वी ६ हजार रुपये घेतल्याची कबुली देऊन आणखी पैशांची मागणी करून १५00 रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपी तलाठी मैदमवार यास १५00 रुपये लाच स्विकारतांना रंगेहात पकडले. सदर कारवाई पोलिस उपायुक्त तथा पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील तथा उपअधीक्षक डी.एन. घुगे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, नापोशि सुभाष गोहोकार, संतोष येलपुलवार, अजय बागेसर, राहूल ठाकरे यांनी केली. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ माजली आहे.