विदर्भवाद्यांचे गुरूवारी नागपूरात धरणे

0
21

नागपूर,दि.05 – वेगळ्या विदर्भाचा शंखनांद करून राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपने येत्या डिसेंबरपूर्वी वेगळ्या राज्याची घोषणा करावी, अन्यथा विदर्भातील भाजपचे पानिपत केल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी दिला.

मानेवाडा रोडस्थित मार्कंडेय सभागृहात समितीच्या कार्याकारिणीची सभा आयोजित करण्यात आली होती. वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने येत्या ९ ऑगस्ट रोजी शहीद चौकातील विदर्भ चंडिकेसमोर सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणे देण्यात येईल. २ ऑक्टोबर रोजी सामूहिक उपोषण करण्यात येणार आहे. वेगळ्या विदर्भाच्या आश्वासनाचा भाजप नेत्यांना विसर पडला तर, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी ठरले. वेगळ्या राज्याच्या नावावर विदर्भातून भाजपचे ४४ आमदार निवडून आले. या आधारे राज्यात त्यांना सत्ता स्थापन करता आली, हे नेत्यांनी लक्षात घ्यावे. क्रांती दिनी करण्यात येणाऱ्या आंदोलनानंतर २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिनी सर्व जिल्हे व तालुका पातळीवर एक दिवसाचे सामूहिक उपोषण करण्यात येईल. राज्यकर्त्यांनी याचीही दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे. नेत्यांना विदर्भाची आठवण करून दिली असता आंदोलनकर्त्यांना ‘उचक्के’ म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हिणवतात. निवडणुकीत याचेही उत्तर देण्यात येईल, असेही नेवले म्हणाले.
शहर अध्यक्ष राजू नागुलवार, जिल्हाध्यक्ष अरुण केदार, महिला आघाडी अध्यक्ष विजया धोटे व युवक आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर, मंगलमूर्ती सोनकुसळे, पद्माकर गावंडे, डॉ. महादेव नगराळे, विष्णू आष्टीकर, श्याम वाघ यांची भाषणे झाली. यावेळी गावंडे, उर्वशी गिरडकर, मामा राऊत यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बैठकीस गणेश शर्मा, अनिल केशरवानी, रमेश गिरडकर, सुभाष मलपेद्दीवार, दीपक उमरेडकर, शुभम पौनिकर, केशवराव राखुंडे, तुळशीराम काटनकर, विजय मौंदेकर, प्रभाकर काळे, विठ्ठलराव मानेकर, देवानंद पलांदूरकर, मोहन ढोक, यादव वाईकर, देवेंद्र कदम आदी उपस्थित होते.