आदिवासी असल्यानेच मला लक्ष्य केले- खा. हिना गावित

0
12

नवी दिल्ली,दि.06(वृत्तसंस्था) – आदिवासी महिला खासदार असल्यानेच जाणीवपूवर्क मलाच लक्ष केले. माझ्या गाडीवर चढून तोडफोड करणाऱ्या आंदोलकांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या खासदार हिना गावित यांनी लोकसभेत केली.

 
सभागृहात बोलताना हिना गावित म्हणाल्या, ‘जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी इतरही लोकप्रतिनिधी होते. केवळ मला लक्ष्य करण्यात आले. दहा ते पंधरा जणांनी माझ्या गाडीवरती हा हल्ला केला, गाडी पलटवण्याचा प्रयत्न केला. मी गाडीतून उतरले नसते, तर माझा मृत्यूही झाला असता. हल्ला झाला त्यावेळी केवळ चार पोलिस कर्मचारी उपस्थित होते, त्यांनी या हल्लेखोरांना रोखण्याचे काम केले नाही. ते केवळ बघत राहिले.’
गाडीची तोडफोड करणाऱया 15 जणांवर गुन्हा दाखल झाला. परंतु, त्यांना दोन तासाच्या आत सोडून देण्यात आले. ज्या व्यक्तीने हा हल्ला केला त्याचा हार तुरे घालून सत्कार करण्यात आला, असे काय त्यांना फार मोठे काम केलेला आहे, असा सवालही गावित यांनी उपस्थित केला. मी आदिवासी महिला खासदार आहे, माझं रक्षण पोलिस करु शकत नसतील, तर या राज्यात महिला सुरक्षित आहेत का? या संदर्भात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी खासदार हिना गावित यांनी केली.