खा. गावित या आमच्याच भगिनीः झारीतील शुक्राचार्यांना बळी पडू नका

0
20

धुळेदि.06-  नंदुरबार मतदारसंघाच्या खासदार डॉ. हीना गावित या आमच्या भगिनी आहेत. त्यामुळे त्यांना लक्ष करून किंवा पूर्वनियोजित कट म्हणून त्यांच्यावर हल्ला केल्याचा खासदार गावितांनी केलेला आरोप चुकीचा आहे. मराठा व आदिवासी समाजात तेढ निर्माण होऊ नये, तसा प्रयत्न कुणी करू नये. अन्यथा, तो हाणून पाडू. या घटनेचा काही झारीतील शुक्राचार्य राजकीयदृष्ट्या गैरलाभ उठवून मराठा व आदिवासी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्याला या दोन्ही समाजाने बळी पडू नये, असे आवाहन सुद्धा मराठा क्रांती मोर्चाच्या धुळे जिल्हा शाखेने आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत केले.

दुपारी अडीचला एक कार  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या प्रवेशव्दारातून जात असल्याचे दिसल्यावर काही आंदोलकांनी ते प्रवेशव्दार लावण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी पोलिसांच्या ताफ्याने प्रवेशव्दार उघडण्यासाठी ताकद लावली. मात्र, आंदोलक मोठ्या संख्येने असल्याने प्रवेशव्दार उघडले. या अवसानात पळणारे काही आंदोलक थेट कारच्या टपावर चढले. त्यात वजनामुळे कारचा दर्शनीय काच फुटला. कारमध्ये खासदार डॉ. हीना गावित असल्याचे कुणालाही माहीत नव्हते.

कुठलाही गैरप्रकार घडला नाही
खासदार गावित यांना लक्ष करून किंवा पूर्वनियोजित कट म्हणून त्यांच्यावर हल्ला, धक्काबुक्की केली, असा कुठलाच प्रकार घडलेला नाही. त्यामुळे त्यांनी मला लक्ष केल्याचा आंदोलनावर केलेला आरोप फेटाळून लावत आहे. या घटनेचा काही झारीतील शुक्राचार्य राजकीयदृष्ट्या गैरलाभ उठवून मराठा व आदिवासी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्याला या दोन्ही समाजाने बळी पडू नये. या समाजांमध्ये परस्परांविषयी कटुता निर्माण होऊ नये, असे सांगत शांततेकामी सहकार्य करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, निंबा मराठे, नाना कदम, संभाजीराव देसाई आदींनी पत्रकार परिषदेतून केले. या प्रकरणी वीस आंदोलकांवर खासदार गावित यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलिसांत दाखल झाला आहे.