वसंतराव नाईक कृषी पुरस्कार जाहीर

0
17

यवतमाळ ,दि.11: येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारे वसंतराव नाईक कृषी पुरस्कार महाराष्ट्रातील सात प्रयोगशील शेतकरी आणि दोन कृषितज्ज्ञांना जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या 39 व्या स्मृतिदिनी येत्या 18 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.
वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिभूषण दीपक आसेगावकर यांनी  शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यात पुरस्कारांसाठी निवड झालेले शेतकरी आणि कृषितज्ज्ञांची नावे जाहीर करण्यात आली. त्यानुसार, विदर्भातील तीन शेतकऱ्यांसह माजी आमदार विठ्ठल गणपत घारे (रा. काळुस्ते, ता. इगतपुरी, जि. नाशिक) यांना भात शेतीसाठी, ब्रह्मदेव नवनाथ सरडे (रा. सोगाव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांना निर्यातक्षम डाळिंबासाठी आणि किरण नवनाथ डोके (रा. कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांना केळीचे विक्रमी उत्पादन आणि निर्यातीसाठी हे पुरस्कार जाहीर झालेत.पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये विदर्भातील बडनेरा (जि. अमरावती) येथील रवींद्र माणिकराव मेटकर (आधुनिक कुक्कुटपालन), अंबोडा (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथील सुरेश प्रकाश पतंगराव (रेशीम शेती) तर जानेफळ (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथील श्‍याम मांगीलाल गट्टाणी (सीताफळ बाग व सीताफळ प्रक्रिया उद्योग) यांचा समावेश आहे.
तसेच कापसावरील “गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण’ या विषयावरील पुरस्कारासाठी निवड झालेले डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि कृषिशास्त्रज्ञ डॉ. विलास भाले व केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूरचे डॉ. व्ही. चेन्नाबाबू नाईक या दोन शास्त्रज्ञांनाही पुरस्कृत करण्यात आले आहे. पुरस्काराचे वितरण यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार व कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व केंद्रप्रमुख डॉ. सैयद शाकीर अली तसेच कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या हस्ते शनिवारी (ता. 18) दुपारी 12.15 वाजता स्थानिक बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर नाईक प्रेक्षागृहात करण्यात येईल.
पत्रकार परिषदेला प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक आमदार मनोहर नाईक, स्वागताध्यक्ष डॉ. एन. पी. हिराणी, प्रा. अप्पाराव चिरडे, प्रा. गोविंद फुके उपस्थित होते.