सनातन संस्थेला दहशतवादी घोषित करा – खासदार अशोक चव्हाण

0
7

मुंबई,दि.11(वृत्तसंस्था) – अनेक हिंसक कारवायात गुंतलेल्या सनातन संस्थेच्या एका साधकाच्या घरातून पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने आठ जिवंत बॉंब आणि बॉंब बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. यावरून सनातन संस्था मोठा घातपात करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट आहे. या पूर्वीही बॉंबस्फोट आणि विचारवंतांच्या हत्येप्रकरणात वेळोवेळी सनातनशी संबंधित लोकांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सनातनला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

चव्हाण म्हणाले की, दहशतवादविरोधी पथकाने अटक केलेला वैभव राऊत हा सनातन संस्थेचा साधक आहे. तो हिंदू गोवंश रक्षा समितीच्या मार्फत काम करतो. त्याने सनातन संस्थेशी संबंधित व्यासपीठावर वेळोवेळी अनेक सभा, पत्रकार परिषदांमध्ये अग्रणी राहून भाग घेतलेला आहे. या अगोदर मलगोंडा पाटील, समीर गायकवाड, वीरेंद्र तावडे या सर्वांबरोबरच डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचे धागेदोरेही “सनातन’पर्यंत आल्याचे समोर आले आहे.

कॉंग्रेस सरकारच्या काळातच केंद्राकडे या संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता; परंतु मोदी सरकारने अद्यापही त्यावर कारवाई केली नाही. किंबहुना सनातन संस्थेचे पदाधिकारी मंत्रालय आणि विधिमंडळात मुक्त संचार करीत असून, ते सरकारच्या संपर्कात आहेत, हे स्पष्ट आहे. देशात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून भाजपच्या धर्मांध राजकारणाला पूरक असणाऱ्या सनातनसारख्या कट्टरतावादी संघटनांना मोकळे रान मिळालेले आहे, असे चव्हाण म्हणाले.