संविधानाचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’

0
7

भंडारा,दि.12 – दिल्ली येथील जंतरमंतरवर संविधान तथा संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानास्पद घोषणा देणाऱ्या दोषींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भंडारा जिल्यातील नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात आज नागरिकांनी कलाम शेख यांच्या नेतृत्वात सिहोरा पोलिस स्टेशनला जाऊन निवेदन दिले.दिल्ली येथील जंतरमंतरवर काही देशविरोधी प्रवृत्तीच्या लोकांनी भारतीय संविधानाच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात देखील नारेबाजी केली. या ठिकाणी कथितरित्या संविधानाची प्रतदेखील जाळण्यात आल्याचे व्हिडिओमधून समोर आले आहे. हा व्हिडीओ समाज माध्यमांवर देखील व्हायरल केले आहे. या घटनेने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या घटनेचा निषेध करण्यासाठी नागरिक तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलिस ठाण्यात मोठ्या संख्येने जमले होते. घटनेतील दोषींवर तात्काळ देशद्रोहाच्या कलमाखाली तसेच संविधानातील कलम १६ च्या विरोधात घोषणा देणे, तसेच संविधानाचा अपमान करणे यागुन्ह्यांखाली तक्रार दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. उपस्थित नागरिकांनी या वेळी पोलीस निरिक्षक यांना या संदर्भात निवेदनही सादर केले आहे.