मुख्य बातम्या:

वाशिम जिल्ह्यात ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा शुभारंभ

वाशिम, दि. १५ :  युनिसेफच्या सहयोगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून सुरु होत असलेल्या ‘युवा माहिती दूत’ उपक्रमामुळे शासनाच्या कल्याणकारी योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे, नगराध्यक्ष अशोक हेडा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, ‘युवा माहिती दूत’ उपक्रमामुळे महाविद्यालयीन युवकांना समाजातील गरजू, वंचित लोकांपर्यंत जावून त्यांच्यापर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहचविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये सहभागी होऊन युवकांना आपल्या समाजाची सेवा करता येणार आहे. या उपक्रमामुळे गरजू व पात्र लाभार्थ्यांला शासनच्या कल्याणकारी योजनांची अचूक माहिती तसेच त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे, लागेल याविषयी मार्गदर्शन मिळणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी या उपक्रमामुळे मोठी मदत होणार आहे. शासनाच्या योजनांची प्रभावी व गतिमान अंमलबजावणी होण्यासाठी सुध्दा हा उपक्रम सहाय्यभूत ठरणार असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले.प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाची रूपरेषा सांगितली. यावेळी ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा हेतू व कार्यपद्धती सांगणारी ध्वनीचित्रफित उपस्थितांना दाखविण्यात आली. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

Share